स्वरयंत्राचा पक्षाघात असलेल्या बाळाला मिळाले नवे आयुष्य

स्वरयंत्राचा पक्षाघात असलेल्या नवजात बाळावर यशस्वी उपचार करून त्याला नवे आयुष्य देण्यात परळ येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनला यश आले आहे. नवजात शिशूवर बालतज्ञ तसेच कान, नाक, घसा विकार तज्ञांच्या टीमने यशस्वी उपचार केले. बाळाला नवीन आयुष्य दिल्याबद्दल पालकांनी वाडिया रुग्णालय, शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय पथक तसेच वाडियाच्या सीईओ मिनी बोधनवाला यांचे आभार मानले आहेत.

राखी आणि संदेश खारवी या जोडप्याला 2460 किलोग्रॅम वजनाच्या बाळाच्या आगमनाने अतिशय आनंद झाला, मात्र या बाळाला श्वासोच्छ्वासासंबंधित तक्रारींचा सामना करावा लागत असल्याने बाळाचे पालक अतिशय घाबरले. पालकांनी तातडीने वाडिया रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. सात दिवसांच्या अर्भकाला तातडीने व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आले. सीटी स्पॅन आणि ब्रॉन्कोस्कोपिक मूल्यांकनानंतर स्वरयंत्रासंबंधित पक्षाघाताचे निदान झाले. हा पक्षाघात दुर्मिळ असून स्वरयंत्रात असणाऱया दोन्ही स्वरतंतूंची हालचाल पूर्ण किंवा अंशतः बंद होते.

मिनिमली इन्वेसिव्ह तंत्राने शस्त्रक्रिया

वेळेवर निदान आणि उपचारावर जोर देत वाडिया रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञांनी पारंपरिक ट्रेकिओस्टोमी न करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी सबग्लोटिक बलुनच्या विस्तारासह एन्डोस्कोपिक क्रिकॉइडसारखी विभाजन प्रक्रिया करण्याचे ठरवले. या मिनिमली इनव्हेसिव्ह पद्धतीचा पर्याय निवडून 11 मे रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया सुमारे अडीच तास चालली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बाळाला दोन आठवडे व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आले होते. आता बाळाचे स्वरयंत्र इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्यपणे काम करत आहे.