वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षांवर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील दोन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
बहुजन विकास आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा यशवंत जाधव यांच्यावर 17 नोव्हेंबर रोजी घातक हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र राजमाने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नितीन ढेरे आणि गुहागरचे निरीक्षक सचिन सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती.
या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली. त्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, गुहागर पोलीस ठाण्याचे पथक आणि चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक नेमण्यात आले. या पथकांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत बदलापूर येथून अनुप नारायण जाधव आणि कुणाल किसन यांना अटक केले आहे. या गुन्ह्यात आणखी पाच आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.