सारी दलित चळवळ आजघडीला क्रियावादी होण्याऐवजी निव्वळ प्रतिक्रियावादी बनली आहे. भाजप त्याचाच फायदा उठवत आहे. भाजप आपल्याला भरकटवून सरकारवर शेकणाऱ्या मुद्दय़ांपासून स्वतःची सुटका करून घेत आहे. इतरांनी लादलेल्या अजेंडय़ावर काम करण्याचे आपण थांबवणार आहोत की नाही, असा सवाल संविधानतज्ञ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी केला.
धारावीत डॉ. मनोहर जोशी कॉलेजमध्ये झालेल्या बौद्ध, मातंग, चर्मकार कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्यात माने यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. हा मेळावा राष्ट्रीय चर्मकार संघ, प्रजासत्ताक जनता परिषद आणि आंबेडकरवादी भारत मिशन यांनी आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबूराव माने होते. दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, मातंग समाजातील नेते प्रबुद्ध साठे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उत्तर भारतात चर्मकार समाज नायक
महाराष्ट्रात दलित चळवळीचा कणा हा आंबेडकरी बौद्ध समाज जसा आहे, तसाच उत्तर भारतात चर्मकार समाज हाच दलित चळवळीचा नायक आहे. त्याचा आदर्श येथील चर्मकार, मातंग समाजाने घेऊन दलित चळवळीत नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन दलित पँथरचे नेते सुरेश केदारे यांनी केले.
चर्मकार समाज अत्याचारांचे टार्गेट
बौद्ध समाजात राजकीय बेकी असली तरी अत्याचाराविरोधात तो एकजुटीने उभा ठाकतो. पण त्या संघटितपणाचा अभाव असल्यामुळे चर्मकार समाज हल्ली अत्याचारांच्या निशाण्यावर आला आहे, असे मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार बाबूराव माने यांनी म्हटले.
जातीय ओळख नष्ट करा!
आपली जात आणि जातीय ओळख या गोष्टींना बिलगून बसू नका, असे आवाहन करतानाच मातंग समाजाचे नेते प्रबुद्ध साठे यांनी केले. सर्व दलितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘अनुसूचित जाती’ ही वर्गीय ओळख दिली. पण एक वर्ग म्हणूनही आपण एकवटून आजवर उभे राहिलो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.