बहिणाबाई प्राणिसंग्रहालयासाठी आणखी 24 कोटी, सव्वा वर्ष संग्रहालय बंदच राहणार

चिंचवड, संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयावर नूतनीकरण, सुशोभीकरणाच्या नावाखाली आत्तापर्यंत 20 कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता पुन्हा सुशोभीकरणासाठीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी 24 कोटींची उधळपट्टी करण्यात येणार आहे. नऊ वर्षांपासून पर्यटकांसाठी बंद असलेल्या संग्रहालयास आणखी सव्वा वर्ष टाळे असणार आहे. त्यामुळे पर्यटकांची निराशा होत आहे.

या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी मे 2016 ला सुरुवात झाली. तेव्हापासून संग्रहालयाला टाळे आहे. प्राणिसंग्रहालयासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. संग्रहालयावर आत्तापर्यंत दोन टप्प्यांत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. नऊ वर्षे होऊनही प्राणिसंग्रहालयाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले नसून, संग्रहालयास टाळे आहे. या कामात गैरव्यवहार झाल्याचा आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 36 प्राणी, पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे (एफडीसीएम) हस्तांतरित करण्याचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. महामंडळाने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार या प्राणिसंग्रहालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून ते पूर्ण करावे. पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे त्याप्रमाणे सेवा-सुविधा निर्माण करण्याबाबत सूचना केली आहे. त्यामुळे महापालिकेने जुनी निविदा रद्द केली. संग्रहालयासाठी एक तज्ज्ञ अधिकारी नियुक्त केला. सल्लागार बदलण्यात आला. आराखड्यात बदल व सुधारणा करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविली. स्कायवे इंफ्रा प्रोजेक्ट या ठेकेदाराला तिसऱ्या टप्प्यातील काम देण्यात आले आहे. यासाठी २४ कोटी २ लाख १६ हजार ६८ रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

दोन टप्प्यांत आत्तापर्यंत झालेले काम 

सरपटणारे प्राणी, घाट प्राणी, घर आणि पिंजरा क्षेत्र, मगर आणि घरीयाल प्राणी घर आणि पिंजरा, वेट लैंड अॅवेअरी प्राणी घर आणि पिंजरा, चेलोनिया प्राणी घर आणि पिंजरा, स्टोअर रूम व कर्मचारी सदनिका, प्राणी जळण क्षेत्र आणि शवविच्छेदन क्षेत्र निवारा, प्रवेशद्वार, भूमिगत पाण्याची टाकी, तिकीटघर, व्याख्या केंद्र संरक्षण भिंत, रंगकाम, टेन्साईल रूफिंग, संचालक यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर, प्रशासकीय इमारत, वैद्यकीय दवाखाना, स्वच्छतागृह आणि विलगीकरण कक्षाच्या सुशोभीकरणाचे काम बाकी आहे.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्या नियम व अटीनुसार आणि प्राणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संग्रहालयाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील संग्रहालयाचे काम १५ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत संग्रहालय बंदच राहणार आहे. मनोज सेठिया, सहशहर अभियंता, स्थापत्य उद्यान विभाग