चारधाम यात्रेसाठीची नियमावली जारी, नियमांचे उल्लंघन केल्यास भरावा लागेल मोठा दंड

बद्रिनाथ मंदिर

भाविकांची चारधाम यात्रा व्यवस्थित आणि सुरक्षित करण्यासाठी, प्रशासनाने बद्रिनाथ धाममध्ये अनेक नवीन नियम लागू केले आहेत. मंदिर परिसरात व्हिडिओ कॉलिंग आणि फोटोग्राफीवर बंदी घालण्यात आली आहे. जर या नियमांचे उल्लंघन झाले तर भाविकांना पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. जिल्हा दंडाधिकारी डॉ. संदीप तिवारी यांनी सोमवारी प्रवास व्यवस्थेबाबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान भाविकांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. चारधाम यात्रेमध्ये भाविकांना कापडी चप्पल, बूट आणि जाड मोजे घालण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी हॉटेल मालकांना कापडी बूट आणि मोजे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, मंदिर परिसरात बुटांच्या ढिगाऱ्यांमुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी साकेत तिरहा येथे बुटांचा स्टँड उभारला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

कुटुंबातील एकच सदस्य प्रसाद दुकान सुरू करेल
प्रसादाच्या दुकानांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही कडक कारवाई केली जाईल. मंदिराजवळील गर्दी कमी करण्यासाठी, गेल्या 25 ते 30 वर्षांपासून तेथे दुकाने लावणाऱ्या लोकांनाच दुकाने लावण्याची परवानगी दिली जाईल, असे बीकेटीसीचे सीईओ विजय थापलियाल यांनी सांगितले. याशिवाय, कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला दुकान सुरू करण्याची परवानगी असेल.

बॅरिकेडिंगबाबतच्या व्यवस्थेतही बदल
प्रवाशांची ये-जा सुरळीत करण्यासाठी, पांडुकेश्वरमध्ये पोलीस बॅरिकेडिंगबाबतच्या व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेशानुसार, चमोलीच्या स्थानिक लोकांची तपासणी करू नये आणि प्रवाशांना हॉटेलच्या क्षमतेनुसार पुढे जाण्याची परवानगी द्यावी.

हॉटेल मालकांनी यात्रेकरूंनी बुक केलेल्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी
प्रवास मार्गावरील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेबाबतही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. हॉटेल मालकांनी यात्रेकरूंनी बुक केलेल्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी लागेल, अन्यथा चलनाची कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक सर्वेश पनवार यांनी दिली आहे.

सर्व हॉटेल्समध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवावे
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा विचार करून, सर्व हॉटेल्समध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सक्तीने ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच हॉटेल्समध्ये 13 भाषांमध्ये जारी केलेल्या आरोग्य सल्ल्याचे QR कोड लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दर्शनासाठी टोकन दिले जातील
चारधाम यात्रेत मंदिर दर्शनासाठी स्लॉट सिस्टीम लागू करण्यात आली आहे. यात्रेकरूंना नियोजित वेळी दर्शनासाठी टोकन दिले जातील, जे आयएसबीटी, बीआरओ चौक आणि माना पाससह विविध ठिकाणी तपासले जातील. गौचर आणि पांडुकेश्वरमध्येही प्रवास नोंदणीची कडक तपासणी केली जाईल, असे पर्यटन अधिकारी ब्रिजेंद्र पांडे यांनी सांगितले.