बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात मध्यस्थ याचिका दाखल केली. कथित एन्काऊंटर प्रकरणाशी संबंधित ऑडिओ, व्हिडीओ रेकार्ंडग व इतर कागदपत्रे सोपविण्याची मागणी कुटुंबीयांनी याचिकेतून केली. त्यांची विनंती मान्य करीत न्यायालयाने अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना संबंधित ऑडिओ, व्हिडीओ रेकार्ंडग व इतर कागदपत्रे देण्याचे आदेश पोलिसांना दिले.
अक्षय शिंदेला बनावट एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले. कथित एन्काऊंटरचा विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास व्हावा, अशी मागणी करीत अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यादरम्यान मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कथित बनावट एन्काऊंटर प्रकरणाची सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या पोलिसांकडे असलेला पंचनामा व इतर कागदपत्रांची प्रत देण्याची विनंती अक्षय शिंदेच्या वडिलांतर्फे अॅड. अमित कटारनवरे यांनी केली. ही विनंती खंडपीठाने मान्य केली आणि याचिकाकर्त्या कुटुंबीयांना कागदपत्रे देण्याचे आदेश सरकारी पक्ष, पोलिसांना दिले. त्यानंतर मध्यस्थ याचिका निकाली काढली.