दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झालेल्या बदलापूरच्या ‘त्या’ शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफीचे रॅकेट देशभरात चालवत आहेत. या रॅकेटच्या म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले. अक्षय शिंदे हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष समितीच्या प्रमुख, माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासमोर शाळेच्या ट्रस्टींचे कारनामे उघड करणार होता. त्याआधीच त्याला संपवण्यात आले, असा खळबळजनक दावा उच्च न्यायालयात याचिकेतून केला आहे. तसेच एन्काऊंटर व त्यामागील संपूर्ण कारस्थानाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी अॅड. राजाभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत ठाणे पोलीस आयुक्तांसह मिंधे सरकार व सीबीआयला प्रतिवादी बनवले आहे. बदलापूरच्या शाळेच्या ट्रस्टींचा मानवी तस्करी व चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेटमधील सहभाग, रॅकेटच्या म्होरक्यांचे सत्ताधाऱ्यांशी असलेले कनेक्शन, ट्रस्टींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा रचलेला कट आदी गंभीर दावे याचिकेत केले आहेत. अक्षय शिंदेच्या संशयास्पद एन्काऊंटरवरून विरोधकांनी मिंधे सरकारला टार्गेट केले आहे. याचदरम्यान ही याचिका दाखल झाली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिंधे सरकार आणि गृह खात्याचे धाबे दणाणले आहेत.
याचिकेतील गंभीर आरोप
बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास विलंब झाला होता. त्यामागे शाळेच्या ट्रस्टींचा सहभाग असण्याच्या शक्यतेने बदलापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची विनंती करीत तिरोडकर यांनी ई-मेल केला होता. त्या ई-मेलवरील ठाणे पोलीस आयुक्तांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी तिरोडकर यांनी 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10.59 वाजता ठाणे पोलीस आयुक्तालयात आरटीआयअंतर्गत अर्ज केला.
तिरोडकर यांना आरटीआय अर्ज एसीपींकडे (क्राईम) वर्ग केल्याचे कळवले. मात्र लगेच खासगी नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला व ठाणे पोलीस आयुक्तालयात हजर राहण्यास सांगितले. यादरम्यान अक्षय शिंदेला तळोजा तुरुंगातून बदलापूर पोलीस ठाण्यात नेण्याच्या हालचाली केल्या. ज्या गूढ एफआयआरच्या तपासासाठी अक्षय शिंदेला तिकडे नेले जात होते तो एफआयआर महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून गायब आहे. अक्षय शिंदेला अटक केलेला एफआयआर संवेदनशील एफआयआर नव्हता. त्यामुळे तो एफआयआर वेबसाईटवरून हटवण्याचे काहीही कारण नाही.
अक्षय शिंदेसोबत जे पोलीस अधिकारी होते, त्यात संजय शिंदे नावाचा वादग्रस्त करिअर असलेला पोलीस अधिकारी होता. यापूर्वी गँगस्टर विजय पालांडेचे पलायन व ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांत संजय शिंदेंचे निलंबन झाले होते. या अधिकाऱ्याने प्रत्येकवेळी पुन्हा पोलीस सेवेत रुजू होणे ‘मॅनेज’ केले. गँगस्टर पालांडेच्या प्रकरणात संजय शिंदेंचा युनिफॉर्म पालांडेच्या कारमध्ये सापडला होता.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या घटनेनंतर प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये भिन्नता आहे. काही माध्यमांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या, तर काही माध्यमांनी अक्षय शिंदेने स्वतःवर गोळय़ा झाडल्याचे म्हटले.
ट्रस्टी, सत्ताधाऱ्यांच्या कारनाम्यांची पोलखोल
शाळेच्या फरार ट्रस्टींसह आणखी काही ट्रस्टींचे सत्ताधाऱ्यांशी राजकीय संबंध आहेत. फरार ट्रस्टी देशभरात चालवत असलेल्या मानवी तस्करी व चाईल्ड पोर्नोग्राफीच्या रॅकेटचा म्होरक्या आहे, तर अक्षय शिंदेसारखे तरुण रॅकेटचे ‘फ्रंट मॅन’ आहेत. बदलापुरातून आणखी दोन मुली बेपत्ता झाल्या असून त्यातील एक मुलगी याच शाळेतील आहे. रॅकेट चालवणाऱ्या ट्रस्टीला अद्याप अटक केलेली नाही. अक्षय शिंदेने मीरा बोरवणकर यांच्यापुढे संपूर्ण कटाचा उलगडा केला असता तर ट्रस्टी मोठ्या अडचणीत सापडले असते, याच भीतीने अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करण्यात आल्याचा दावा तिरोडकर यांनी केला आहे.
याचिकेतील विविध मागण्या
ठाणे पोलीस आयुक्तांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा सुरु केलेला तपास न्यायालयाने थांबवावा आणि सीबीआयला तपास करण्याचे निर्देश द्यावेत.
अक्षय शिंदेविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात 16 ऑगस्टला दाखल केलेला एफआयआर तसेच 17 आणि 13 ऑगस्टला दाखल केलेल्या एफआयआरचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा.
तळोजा तुरुंगात असलेली अक्षय शिंदेची कागदपत्रे, त्याने लिहिलेली पत्रे तसेच त्याच्याशी संबंधित इतर सर्व साहित्य सीबीआयकडे सोपवावे.
उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाशी समन्वय साधून सीबीआयने संबंधित गुन्ह्यांचा सखोल तपास करावा.