Badlapur Sexual Assualt – ‘ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत…’ वाचा अंगावर काटा आणणारी व्हायरल पोस्ट

देशासह राज्यभरातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान या प्रकरणाची तक्रार द्यायला गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 11 तास पोलीस ठाण्यात बसवण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. या प्रकरणाबाबत पोलिसांकडून आरोपी आणि शाळेला पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे का? असा प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान हे संपूर्ण प्रकरण प्रकाश झोतात कसे आले याबाबत काही गोष्टी सध्या सोशल मीडियालर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. नागरिकांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या घटनेमुळे आपल्या मुली आपल्याच देशात सुरक्षित नसल्याचे दिसू लागले आहे. यासंदर्भात एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ती वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका 3 वर्षे 8 महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहुलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशीर भाग आम्ही निःशुल्क बघू आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊ. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या, अशी पोस्ट व्हायरल होत आहे.

दरम्यान ही संपूर्ण घटना अंगावर काटा आणणारी आहे. आपला देश 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मात्र देशातील महिलांची सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे, अशी प्रतिक्रीया सध्या नागरिकांकडून व्यक्त केली जाते.

तुमचे पैसे नको, योजना नको, लाडक्या बहिणीच्या लेकीला न्याय द्या! संतप्त महिलांनी सरकारला फटकारले