बदलापुरात बर्थडे पार्टीत तरुणीवर मित्रांचा अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

प्रातिनिधिक फोटो

बर्थडे पार्टीसाठी मैत्रिणीच्या घरी गेलेल्या तरुणीवर दोन मित्रांनीच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात समोर आली आहे. केक कापल्यानंतर पेयात मैत्रिणीने गुंगीचे औषध दिले. त्यानंतर या नराधमांनी पीडितेवर अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडितेची काही दिवसांपूर्वी शिरगाव येथे राहणाऱ्या भूमिका या तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसासाठी पीडित तरुणीला तसेच तिच्या दोन मित्रांना तिच्या घरी पार्टीसाठी बोलावले होते. रात्रभर पार्टी केल्यानंतर भूमिकाने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकले होते. त्यानंतर ही तरुणी बेशुद्ध होताच पार्टीसाठी आलेल्या दोन मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने पीडित तरुणीच्या पालकांनी भूमिकाला संपर्क केला असता तुमची मुलगी मद्य पिऊन येथे पडल्याचे सांगितले. दरम्यान घरी परतल्यानंतर शुद्धीवर आलेल्या पीडितेला आपल्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. याबाबत तिने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली असता तरुणीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी भूमिका मेश्राम हिच्यासह सातारा येथून आलेले मित्र शिवम राजे व संतोष रुपवते या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.