
बहुचर्चित बदलापूर एन्काउंटर प्रकरणातील दोषी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे की नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला केला.
अक्षय शिंदे एन्काउंटरचा तपास राज्य सीआयडी करत आहे. असे असताना याचा स्वतंत्र गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहेत का, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी राज्य शासनाकडून केला. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या एन्काउंटरचा न्यायालयीन चौकशीचा अहवाल आला आहे. हा एन्काउंटर बनावट असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदवण्यात आला आहे. आता तरी राज्य शासन दोषी पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवणार आहे की नाही, असा प्रश्न खंडपीठाने केला.