बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास हलक्यात घेऊ नका. तपासाला तुम्ही जाणीवपूर्वक उशीर करताय का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने आज सीआयडीवर ताशेरे ओढले.
पोलीस याचा योग्य प्रकारे तपास करत नव्हते, म्हणून हा तपास तुमच्याकडे सोपवण्यात आला. पण तुमचे अजून जबाब नोंदवून झाले नाहीत. तसेच तपासाची माहिती महानगर दंडाधिकाऱयांना देण्यास विलंब करताय. यावरून तुमच्या तपासावरच संशय निर्माण होतोय, असे खडे बोल न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने तपास यंत्रणेला सुनावले.
बाल अत्याचार प्रकरणी 24 ऑगस्टला अक्षयला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचा एन्काउंटर झाला. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या तपासासाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणी करणारी याचिका त्याच्या वडिलांनी केली आहे. यावरील सुनावणीत तपासाच्या दिरंगाईवर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. 20 जानेवारी 2025 पर्यंत तपासाची सर्व कागदपत्रे व माहिती दंडाधिकारी न्यायालयाला द्या, जेणेकरून दंडाधिकारी न्यायालय त्यांचा अहवाल देऊ शकतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
आमचा संयम तोडू नका
या एन्काउंटरच्या तपासाची कागदपत्रे दंडाधिकारी यांना दिल्यानंतरच ते त्यांचा अहवाल देणार आहेत. पण तुम्ही तर अजून जबाब नोंदवण्याचेच काम करत आहात. प्रत्येक तपासात पारदर्शकता हवी. अक्षय शिंदेचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला आहे. याचा तपास गांभीर्यानेच व्हायला हवा. विनाकारण आमचा संयम तोडण्याचा प्रयत्न करू नका, असेही न्यायालयाने तपास यंत्रणेला बजावले.