बदलापूरच्या एका शाळेतील दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशातच या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी संशयास्पद एन्काऊंटर करण्यात आला. या घटनेतून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्वच्छतागृहात काम करणाऱ्याला व्यक्तीला बंदूक चालवता येईल का? संडास साफ करणाऱ्या आरोपीला गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कोणी दिलं? आरोपी तुरूंगात असताना याच लोकांनी त्याला ट्रेनिंग दिलं का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी मिंधे आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर हा संशयास्पद आहे. पोलिसांच्या कमरेला असलेली बंदूक लॉक असते. ती हिसकावून लॉक काढून आरोपीने गोळीबार केला, हे कोणालाही पटण्यासारखे नाही. काल मारल्या गेलेल्या आरोपी अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केले आहेत. ते समोर येऊ नये म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं प्रकरण संपवून टाकलं आहे. देवेंद्र फडणवीस, मिंधे आणि पोलिसांना आपटे, कोतवाल यांना वाचवायचे आहे, असा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला.
तुम्ही विचार करा, न्यायालयीन कस्टडीतला एक गुन्हेगार आहे. ज्याचा तुम्ही फास्टट्रॅकवर खटला चालवणार आहात आणि त्याला फाशी देणार आहात, असे तुम्ही म्हणालात. तर मग त्याचा तातडीने एन्काऊंटर करण्याची गरज का पडते? पोलीस व्हॅनमध्ये बेड्यांनी जखडलेला बुरखा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल? पोलीस अधिकाऱ्याच्या कंबरेच रिव्हॉलव्हर कसं काढेल? एवढी आमची पोलीस लेचीपेची आहे? तर मग फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
दुसऱ्या शिंदेचा राजकीय एन्काऊंटर जनता करेल!
महाराष्ट्रात जरांगे पाटीलांनी जे वातावरण निर्माण केलंय, अनेकंनी सरकारच्या खुर्चीला खालून जी आग लावली त्याच्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी हे केलयं का? तो आरोपी होता त्याला शिक्षा देणे गरजेचे होते. कोणत्याही बलात्काऱ्याला जनतेच्या हाती सोपवून त्याला न्यायालयात न नेता जागच्या जागी शिक्षा देणे ही बाळासाहेबांची शिकवण होती. आणि जनतेची देखील हीच मागणी होती. त्यासाठी जनता रस्त्यावर उतरली. मात्र तेव्हा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. यासाठी जनता तुम्हाला माफ करणार नाही. एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला. एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा राजकीय एन्काऊंटर जनता करेल, असे म्हणत संजय राऊत यांनी मिंध्यांवर निशाणा साधला.