अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण; नवी माहिती आली समोर

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी एन्काऊंटर केला.

ठाणे क्राइम ब्रँच युनिट एकचे पथक अक्षयला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडसाठी ठाण्याला घेऊन येत असताना व्हॅनमध्येच अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. अक्षयने तीन राऊंड फायर केले. या वेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय जागीच ठार झाला. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजता मुंब्रा बायपास येथे घडली. अक्षयने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर अक्षयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदेवर गोळी चालवणारे पोलीस अधिकारी संजय शिंदे यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. संजय शिंदे मुंबईत कार्यरत होते. अरुण टिकू हत्याकांडातील आरोपी विजय पलांडेला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होते. याशिवाय अनेक वादात ते अडकले होते, अशी देखील माहिती समोर येत आहे.

पोलीस सेवेतून त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला होता. मात्र तो प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आणि त्यांना सेवेत कायम ठेवण्यात आल्याचे समजते. त्यानंतर त्यांना ठाण्यात पाठवण्यात आले. आता अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीत आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.