बदलापूर बाल अत्याचार प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. मयत अक्षय शिंदे व शाळा व्यवस्थापन, ट्रस्टींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली.
बाल अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात कामचुकारपणा करणाऱया पोलीस निरीक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू आहे, असे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. पीडितेला दुसऱया शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. आधीच्या शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला मिळत नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले. याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश देत खंडपीठाने सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.
अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही
अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांच्याशी संपर्क होत नाही, असे अॅड. अमित कटारनवरे यांनी न्यायालयाला सांगितले. शिंदेच्या घराबाहेर एक पोलीस तैनात असतो. ते कामाला जातात. सुरक्षा देण्याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यास त्यांनी नकार दिला, असे सरकारी वकील वेणेगावकर यांनी स्पष्ट केले. शिंदे कुटुंबीयांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यांनी सुरक्षेसाठी नकार दिलेला नाही, असा दावा अॅड. कटारनवरे यांनी केला. पोलिसांनी मराठीतून सर्व त्यांना समजावले होते, असा युक्तिवाद अॅड. वेणेगावकर यांनी केला. मुंबईत अनेक वर्षे राहूनही अनेकांना मराठी येत नाही, असे न्यायालयाने फटकारले.