
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्रीचे अनेकांकडून कौतुकही झाले. परंतु, हैदराबादमधील एका शिक्षिकेने या चित्रपटाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. पुष्पा चित्रपटाचा विद्यार्थ्यांवर वाईट प्रभाव पडला असून पुष्पामुळे विद्यार्थी बिघडले आहेत, असा गंभीर आरोप या शिक्षिकेने केला आहे. ही शिक्षिक एवढ्यावरच थांबली नाही तर तिने शिक्षण आयोगाकडे चित्रपटाबाबत तक्रार सुद्धा केली आहे. शाळेत जेव्हा विद्यार्थी बेजबाबदारपणे वागतात तेव्हा ‘प्रशासक’ म्हणून आपण अपयशी ठरतोय, अशी खंतही या शिक्षिकेने व्यक्त केली आहे. पुष्पा चित्रपटानंतर शाळेतली मुले विचित्र हेअरस्टाइल करत आहेत, ते अश्लील बोलतात. आपण फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतोय. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतोय. ही परिस्थिती केवळ सरकारी शाळांमध्येच नाही तर खासगी शाळांमध्येही आहे. प्रशासक म्हणून मला नेहमी वाटते की मी अपयशी ठरत आहे, असे या शिक्षिकेने म्हटले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याने त्यांच्यावर दबाव येऊ शकतो, असेही या शिक्षिकेचे म्हणणे आहे.
नेटकऱ्यांकडून सावध प्रतिक्रिया
शिक्षिकेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून मात्र सावध प्रतिक्रिया आल्या आहेत. काही यूजर्संनी शिक्षिकेच्या बाजूने कमेंट केल्या आहेत. तर काहींनी चित्रपटाच्या बाजुने कमेंट केल्या आहेत. चित्रपट पाहून विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो, असे काही यूजर्सने म्हटले तर तुम्ही काही चांगलं बोलू शकत नसाल तर ठीक आहे. पण किमान आणखी वाईट तरी बोलू नका’, अशी टीका ‘पुष्पा’च्या काही चाहत्याने केलीय. ‘मग गेम चेंजर आणि महर्षीसारखे चित्रपट पाहून विद्यार्थी लगेच आयएएस अधिकारी किंवा शेतकरी बनतील का’, असा उपरोधिक सवालही शिक्षिकेला विचारला आहे.