3699 गृहनिर्माण प्रकल्पांना खरंच भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे का? महारेरा संबंधित प्राधिकरणाकडून सत्यता तपासून घेणार

महारेराने व्यपगत (Lapsed) प्रकल्पांना पाठवलेल्या नोटीसला प्रतिसाद म्हणून 3699 प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांनी भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड केले आहे. कल्याण-डोंबिवली भागातील गृहनिर्माण प्रकल्पातील फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व भोगवटा प्रमाणपत्रे महारेराने संबंधित प्राधिकरणांकडून प्रमाणित करून घेण्याचे ठरविले आहे.  सर्व संबंधित प्राधिकरणांना या प्रकल्पांचा तपशील पाठवून या प्रकल्पांना खरेच भोगवटा प्रमाणपत्र जारी केले का? याची खात्री करून त्याबाबतची वस्तुस्थिती महारेराला पत्र मिळाल्यापासून दहा दिवसांत कळविण्याची विनंती करण्यात आली आहे. यात मुंबई शहरातील 106 आणि उपनगरातील 430 तसेच ठाण्यातील 557 प्रकल्पांचा समावेश आहे.

प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाला काही अटींसापेक्ष घर विक्रीसाठी महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच प्रकल्प उभारणीच्या काळात त्रैमासिक प्रगती अहवाल, वार्षिक अंकेक्षण अहवाल सादर करावे लागतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्राधिकरणाचे भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. हे भोगवटा प्रमाणपत्र महारेराने स्वीकारले की संबंधित प्रवर्तकाला त्या प्रवर्तकाच्या खात्यातील सर्व पैसे काढण्याचे स्वातंत्र्य असते. शिवाय त्यांना त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने कुठलीही विवरणपत्रे भरावी लागत नाही.

…तर संबंधित प्राधिकरणाला धरणार जबाबदार 

दहा दिवसांच्या कालावधीत प्राधिकरणांकडून ज्या प्रकल्पांबाबत प्रतिसाद मिळणार नाही त्यांचे भोगवटा प्रमाणपत्र खरे आहे, असे गृहीत धरून या अनुषंगाने प्रकल्प पूर्ण झाल्याची प्रक्रिया महारेरा सुरू करेल. यात काही चुकीचे झाल्यास त्याची जोखीम आणि खर्चासह संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील, असेही महारेराने या पत्रात स्पष्ट केलेले आहे.