बच्चू कडू यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले, महायुतीत आतापासूनच रस्सीखेच

>> प्रसाद नायगावकर

विधानसभा निवडणुकांना अद्याप तीन-चार महिन्यांचा कालावधी आहे. पण त्यापूर्वीच महायुतीमधील पक्षांमध्ये जुंपली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू हे महायुती सरकारला घरचा अहेर देत आहेत. आता तर त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्याने महायुतीमधील रस्सीखेच समोर आली आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांत सत्ताबदल झाल्यानंतर अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेले दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर अनेकदा मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही असे बॅनर लागले होते. यातच आता दोन आमदार असलेल्या प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्याने महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.

बच्चू कडू यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली. या बॅनरवर बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यातच बच्चू कडू यांच्या फोटोच्या पाठीमागे विधान भवन आणि लाल दिव्याच्या गाडीचाही फोटो लावण्यात आला आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे झळकवण्यात आलेल्या या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.