एसटी महामंडळातील चालक वाहकांच्या पगाराच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा होत असताना प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी मिंधे सरकारला घरचा अहेर दिला आहे. ”तुमच्या खासगी गाड्यांच्या चालकांना 25 ते 30 हजार पगार देता व जनतेची सेवा करणाऱ्या एसटीच्या चालकाला 12 हजार पगार देता. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? किमान वेतन कायदा असतानाही जर शासनच कायदा मोडत असेल तर थोबाडीत कुणाच्या मारायची? अशी जोरदार टीका बच्चू कडू यांनी केली.
”अध्यक्ष महोदय तुमच्या मागे सत्यमेव लिहले आहे. त्यामुळे दादा भुसे यांनी अध्यक्ष महोदयांना फक्त सत्य सांगावं. अध्यक्ष महोदय तुमचा चालक असो किंवा मंत्रीमहोदयांच्या चालकाला जो पगार भेटतो तो एसटीच्या चालकाला का मिळत नाही? तुमचा चालक एसीच्या गाडीत फिरतो. एसटीचा चालक एवढ्या भर उन्हात गाडीत फिरत असतो. त्याचे कष्ट अधिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त अन्यायासाठी अफजलखानाला फाडला होता. मग तुम्ही अन्याय का करताय? किमान वेतन कायद्यानुसार किमान 14 हजाराच्या वर वेतन दिलं गेलं पाहिजे. मग शासनच कायदा मोड़त असेल तर थोबाडीत कुणाच्या मारायची? काय सत्य काय असत्य ते सांगा तुम्ही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एका चालकाला तुम्ही पंचवीस ते तीस हजार देता आणि सर्वांची सेवा करणाऱ्याला 12 हजार देता याची लाज वाटत नाही का? याचा राग का येत नाही का? असे बच्चू कडू म्हणाले.