Ahmedpur news – लाडक्या गायीचं अनोखं डोहाळं जेवण, महिलांनी ओटी भरली, साड्यांचा आहेर दिला अन् पंगत बसली

आई होणे प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचं कोड कौतुक करतं. तिला काय हवं नको ते बघतं. पण अहमदपूर तालुक्यातील मौजे ढाळेगाव येथील एका शेतकऱ्यानं लाडक्या गायीचं डोहाळे जेवण धुमधडाक्यात केलं. यानिमित्त अवघ्या गावाला गोड जेवणही देण्यात आलं. या सोहळ्याची पंचक्रोशीमध्ये चर्चा आहे.

हौसेला मोल नसते… ही म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर, खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही आणि हौस करणारा शेतकरी असेल तर मग तर विचारूच नका. मौजे ढाळेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी चंद्रकांत पेड या शेतकऱ्यानं चक्क आपल्या लाडक्या गायीचा डोहाळ जेवणारा मोठा कार्यक्रम केला. या निमित्त सर्व पाहुणे मंडळी, मित्र परिवार आणि गावकऱ्यांना आमंत्रण देण्यात आलं.

गावातील जवळपास 800हून अधिक महिलांनी गायीच्या डोहाळ जेवणाला हजेरी लावली. एखाद्या गरोदर महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो, अशाच प्रकारे सर्व रितीरिवाज पार पडले. गोठ्यात मंडप घालण्यात आला, यामध्ये लाईट डेकोरेशन करण्यात आले होते. गायीला सजवून ओवाळण्यात आले. महिलांनी साडीच्या स्वरुपात आहेर देऊन गायीची पूजा करत तिची ओटी भरली. यानंतर सर्वांचे गायीसोबत फोटो सेशनही झाले. गायीला हिरवा चारा, पंचपक्वान्नाचे जेवण घालण्यात आले. आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, महिला व ग्रामस्थांनाही जेवणाचा बेत करण्यात आला होता.

शेतकरी चंद्रकांत पेड यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना सांगितलं की, देवाची, संतांची, आई-वडिलांची आणि वडीलधाऱ्या माणसांची सेवा करून मोक्ष प्राप्त होतो, असे म्हणतात. त्याचप्रमाणे गोमातेचीही सेवा करणे क्रमप्राप्त आहे. घराच पिढ्यान पिढ्या गोपालनाचा व्यवसाक केला जातो. गोठ्यातील गायी आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत. त्यामुळं त्यांचं संरक्षण करणं आणि काय हवं नको ते पाहणं आपलं कर्तव्यच आहे.