हॉस्पिटलमध्ये बाळांची अदलाबदल…डीएनए चाचणीतून समजणार सत्य

आठ दिवस तुमच्या कुशीत जे बाळ होतं ते तुमचं नाही, दुसऱ्या कुणाचं आहे, असं समजलं तर मातेची काय अवस्था होईल… छत्तीसगढच्या दुर्ग जिल्हा रुग्णालयात दोन नवजात बाळांची अदलाबदल झाली. आठ दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 12 दिवसांच्या निरागस बाळांना आता डीएनए टेस्टला सामोरे जावे लागेल. जेणेकरून त्यांचे खरे आईवडील कोण ते समजेल. दुर्ग जिल्हा रुग्णालयात 23 जानेवारी रोजी साधना सिंह आणि शबाना कुरेशी यांनी सीझरेयन डिलिव्हरीने बाळांना जन्म दिला. बाळांच्या मनगटावर टॅग लावताना गडबड झाली. बाळ-बाळंतिणींना डिस्चार्ज दिल्यानंतर आठ दिवसांनंतर शबानाच्या कुटुंबीयांची नजर बाळाच्या हातातील टॅगवर गेली. त्यावर साधना सिंह असे नाव होते. ते पाहून शबानाच्या कुटुंबीयांना धक्का बसला. बाळाची अदलाबदल झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी डॉक्टरांना कळवले. ही बातमी रुग्णालयात पोचली आणि खळबळ उडाली. बाळांच्या जन्माच्या वेळी काढलेले फोटो शोधून काढण्यात आले. फोटोमध्ये बाळांचा रंग आणि चेहऱ्यावरील काळी खूण तपासण्यात आली. त्यावरून असं दिसून आलं की, साधनाकडे असलेले बाळ शबानाचं आणि शबानाकडे असलेले बाळ साधनाचे आहे. आता डीएनए टेस्ट केल्यानंतरच बाळाचे खरे आईवडील कोण ते समजेल.