
वशिलेबाजीच्या किडीने पोखरत चाललेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेला वाचवण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने (एमओए) गेल्याच आठवडय़ात अस्थायी समिती नेमली होती. मात्र एमओएने नेमलेली समितीच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याची हरकत घेत या समितीने राज्य संघटनेच्या कार्यालयात प्रवेश केला तर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू, असा इशारा देत कबड्डीचे प्रभारी सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी थेट एमओएचे अध्यक्ष अजित पवारांनाच आव्हान दिले आहे.
बाबुराव चांदेरे हे कबड्डीचे काळजीवाहू सरकार्यवाह आहेत. विशेष म्हणजे ते निवडणूक न लढवता अजित पवारांच्याच आशिर्वादाने संघटनेवर आले. तसेच सहा महिन्यांपूर्वी निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारिणीच्या संमतीनेच त्यांना प्रभारी नेमल्याची माहिती खुद्द चांदेरे यांनीच दिली होती. दुसरीकडे एमओएचे अध्यक्षही अजित पवार आहेत. त्यांच्या संघटनेने नेमलेल्या अस्थायी समितीला बेकायदेशीर जाहीर करून चांदेरे यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे हा गोंधळ कोर्टात जातो की अजित पवारांच्या कोर्टातच सोडवला जातो, हे लवकरच दिसेल.
तसेच चांदेरे यांच्यानुसार त्यांची राज्य कार्यकारिणी योग्य काम करत असताना एमओएला अस्थायी समिती नेमण्याचा कोणताही अधिकार नाही. मुळात एमओए आणि राज्य कबड्डी संघटना या दोन्हीही धर्मादाय संस्था आहेत. त्यामुळे या दोन्ही संघटनांना दुसऱ्या संघटनेसाठी समिती नेमू शकत नाहीत. हा अधिकार फक्त उच्च न्यायालय आणि धर्मादाय आयुक्त यांनाच असल्याचे चांदेरे यांनी एमओएला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मात्र एमओएच्या समितीला घटनाबाह्य आणि बेकायदेशीर म्हणणाऱ्या बाबुराव चांदेरे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक घटनाबाह्य निर्णय घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे. मीच म्हणजे कायदा आणि मीच कबड्डीचा सर्वेसर्वा अशा आविभार्वात वावरत असलेल्या चांदेरे यांनी राज्यात जिल्हा संघटनांचे वाढवलेले संघ हे पूर्णतः बेकायदेशीर आहेत. ‘एक जिल्हा-एक संघटना’ असा नियम असताना त्यांनी मुंबई, उपनगर, पुणे या जिल्ह्यांच्या आकडा 3 वरून 7 वर नेला आहे. त्यांचा हा निर्णय राज्य संघात सर्वाधिक पुणे जिल्ह्याचेच खेळाडू खेळावेत यासाठी असल्याचाही आरोप अनेक कबड्डी संघटकांनी केला आहे. विशेष म्हणजे जिल्हा संघाचे संघ वाढवण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत यायला हवा होता, तेथेच तो मंजूरही व्हायला हवा होता, पण चांदेरेंनी स्वतःची मनमानी करत संघ वाढवले आणि राज्य संघात स्वतःच्याच फाऊंडेशनमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंची वर्णी लावली. याबाबत अनेक जिल्ह्यांनी आक्षेप घेतला, पण चांदेरेंनी कुणालाही भीक घातली नाही.
अजित पवार कुणाच्या पाठीशी?
राज्य संघटनेत चांदेरेंच्या अनेक तक्रारी येत असूनही अध्यक्ष अजित पवार यांनी सर्वांच्या तक्रारींकडे नेहमीच कानाडोळा करत चांदेरेंना आपला आशीर्वाद दिला आहे. मात्र असे असतानाही पवारांच्या एमओएने त्यांच्याच राज्य संघटनेसाठी नेमलेल्या अस्थायी समितीमुळे सारेच गोंधळात पडले होते. त्यातच आता त्यांच्याच कट्टर समर्थकाने म्हणजेच बाबुराव चांदेरेंनी पवारांच्याच एमओएला दिलेले आव्हान पाहून सारेच चक्रावले आहेत. साऱ्यांना एकच प्रश्न पडलाय, अजित पवार नेमके आहेत कुणाच्या पाठीशी? याचे उत्तर खुद्द अजित पवारच देऊ शकतील.
संघटनांच्या तक्रारीनंतर अस्थायी समितीची निवड – शिरगावकर
राज्यातील क्रीडा संघटनांमध्ये काही वाद असेल, त्यांच्याबद्दल तक्रारी असतील तर त्या सोडवण्यासाठीच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आहे. राज्य कबड्डी संघटनेच्या कारभारात आणि कामकाजात पक्षपातीपणा वाढत होता. गुणी खेळाडूंवर अन्याय होत असल्याच्या वारंवार तक्रारी आमच्याकडे येत असल्यामुळेच राज्य कबड्डी संघटनेचा कारभार निःपक्षपातीपणे चालावा म्हणून आम्ही अस्थायी समिती नेमली. तसेच कबड्डीच्या कार्यकारिणीचा कार्यकाल संपून नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. दुसरीकडे त्यांच्या निवडणुकीलाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याच कारणास्तव कबड्डीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी कबड्डीच्या जाणकार आणि ज्येष्ठ व्यक्तींचीच अस्थायी समितीवर निवड करण्यात आली आहे. जर कबड्डी संघटनेची एक व्यक्ती या निवडीला बेकायदेशीर मानत असेल तर नेमलेली समितीच याबाबत बैठक बोलावून आपला निर्णय घेईल.
शिरगावकरच कटकारस्थानाचे सूत्रधार – चांदेरे
एमओएच्या घटनेत किंवा समितीत किंवा सर्वसाधारण सभेत राज्य कबड्डी संघटनेसाठी अस्थायी समिती नेमावी, अशा निर्णयाला मान्यता देण्यात आलेली नाही. काही व्यक्तींच्या प्रभावाखाली एमओएचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर काम करत आहेत. ते कबड्डीत हस्तक्षेप करून संघटना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संघटनेत किंवा कार्यालयात काही बेकायदेशीर कृत्य घडल्यास तेच जबाबदार असतील. कारण तेच या कटकारस्थानाचे सूत्रधार आहेत, असा आरोप बाबुराव चांदेरे यांनी केला.