शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे बाभई स्मशानभूमीच्या कामाला मिळणार गती; मीरा कामत यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा

बिल्डरांनी बांधलेल्या टॉवर्समधील घरे विकली जावीत म्हणून प्रदूषणाचे कारण देत मुंबई महानगरपालिकेने बोरिवलीच्या बाभईतील हिंदू स्मशानभूमीलाच टाळे ठोकले होते. याबाबत शिवसेनेने विधिमंडळात आवाज उठवला होता. याच प्रश्नाबाबत सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत यांनी केलेल्या उपोषणालाही शिवसेनेने पाठिंबा दिला. अखेर पालिकेने आता या स्मशानभूमीच्या कामाला गती देण्याचे मान्य केले असून एका महिन्यात स्मशानभूमीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

शिवसेनेचे माजी आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदेत यासंदर्भात विशेष उल्लेख सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. बाभई हिंदू स्मशानभूमी मोडकळीस आल्याचे कारण देऊन गेल्या वर्षीपासून महापालिकेने बंद केली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. बाभई स्मशानभूमीतील धूर कित्येक वर्षांपासून फिल्टर करूनच बाहेर सोडला जात आहे. मुंबईतील वाहने, बांधकामे यामुळे होणाऱया प्रदूषणाचे प्रमाण पाहता या स्मशानामुळे होणारे प्रदूषण फारच नगण्य आहे, असे पोतनीस यांनी निदर्शनास आणून दिले होते. ही स्मशानभूमी पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत होते. यातच आज सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत यांनी पालिकेच्या आर/मध्य कार्यालयात उपोषण आंदोलन सुरू केले. यावेळी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी-कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. याची दखल घेत पालिका प्रशासनाने ही स्मशानभूमी पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, उपविभागप्रमुख विनायक सामंत, प्रवीण प्रधान, प्राची साईराम, शाखाप्रमुख विपुल दारूवाले, सागर सरफरे, एडविन बंगेरा, प्रेरणा राणे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.