Yavatmal News – बाबाजी दाते महिला बँक अपहारप्रकरणी FIR दाखल, मुख्य 23 आरोपींची नावं समोर

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत बनावट कर्ज प्रकरण, कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमत्तांचे वाढीव मूल्यांकन दाखवून मोठे कर्ज उचलून फसवणूक केल्याने बँक डबघाईस आली. तसेच ठेवीदारांचे कष्टाचे पैसे बुडाले. या प्रकरणात 2022 पासून चौकशी सुरू होती. अखेर सोमवारी रात्री उशिरा विशेष लेखापरीक्षक यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणातील मुख्य 23 आरोपींची नावे समोर आली आहेत.

या बँकेमध्ये अपहार करण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांची संख्या लेखापरीक्षकांनी अहवालात निश्चित केली आहे. त्यामध्ये बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह कर्मचारी, व्यवस्थापक असे मिळून पदाधिकारी, कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. सोबतच बँकेने नियुक्त केलेले मूल्यांकनकार (व्हॅल्युअर) तर बँकेच्या असे दाखल झाली आहेत.

आरोपींची नावे पुढील प्रमाणे…

1 – अशोक दत्तात्रय कंचलवार व अहवालात नमूदनुसार सर्व संबंधित
2 – कमलकिशोर गुरुप्रसाद जयस्वाल व अहवालात नमूदनुसार सर्व संबंधीत
3 – शिवनारायण रामप्रसाद भुतडा व अहवालात नमूद नुसार सर्व संबंधीत
4 – हितेश गंडेचा
5 – रवींद्र दामोदर येरणे
6 – विक्रम तुलसीदास नानवाणी
7 – प्रकाश आनंदराव पिसाळ
8 – राजेंद्र गायकवाड
9 – दीपक निलावार व अहवालात नमूद नुसार सर्व संबंधीत
10 – विलास सुधाकर महाजन
11 – पवन विठ्ठल राऊत
12 – सुदर्शन कमलाकर दिलपे
13 – प्रमोद प्रभाकर सबनीस
14 – स्वप्नील प्रकाश अमरी
15 – सचिन मधुकर माहुरे
16 – योगेश रामचंद्र नानवाणी
17 – विमल अशोक दुर्गमवार
18 – सुभाष गणपत तोटेवार
19 – अशोक रामचंद्र दुर्गमवार
20 – श्रीमती सुजाता विलास महाजन व अहवालात नमूदनुसार सर्व संबंधित बँक अधिकारी
21 – सुरेंद्र केळापुरे व अहवालात नमूदनुसार सर्व संबंधित मुल्यांकनकार
22 – ललीता गणपत निवल व अहवालात नमूदनुसार संबंधित कालावधीतील सर्व संचालक
23 – विद्या शरद केळकर व अहवालात नमूदनुसार संबंधित कालावधीतील सर्व संचालक

बँकेच्या अपहारात महाराष्ट्र ठेवीदार व गुंतवणूकदार हित संरक्षण कायदा 1999 च्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. यासोबतच कलम 420, 406, 409, 417 418, 421, 424, 467, 468, 471, 477 A. 120 (B) , या भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार गुन्हा नोंद झाली आहे. ज्यामध्ये संगनमताने तसेच कट रचून बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

पॅनलवरील ऑडिटर यांच्यावरही लेखापरीक्षणातून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कर्जाची उचल करताना बनावट कागदपत्र सादर केल्याचा ठपका 142 कर्जदारांवर ठेवण्यात आला आहे. यावरून सरासरी 206 जणांवर फसवणुकीचा आरोप आहेत. ठेवीदारांनी बँकेत विश्वासाने ठेवलेल्या 242 कोटींच्या रकमेची विविध कर्ज प्रकरणातून अक्षरशः खिरापत वाटण्यात आली. तारण मालमत्तेचे वास्तवातील मूल्यांकन नसतानाही मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम मंजूर करण्यात आली. नंतर सोईस्करपणे हे कर्ज बुडविण्यात आले. यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आल्या. त्यानंतर ही बँक बंद पडल्याने अवसायकांची नियुक्ती झाली.

दरम्यान, बँकेतील या विविध गैरप्रकाराबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर सहकार आयुक्त पुणे यांच्या आदेशावरून अमरावती येथील विशेष लेखापरीक्षक सुनीता पांडे यांची चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 2016 पासून बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील कर्ज प्रकरणाची सखोल पडताळणी केली. ही तपासणी जुलै 2022 पासून सुरू होती. याचा अंतिम अहवाल 16 जुलै 2024 रोजी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सादर करण्यात आला. यावर सुमारे दीड हजार पानांच्या या अहवालास आयुक्तांनी मान्यता दिली. त्यानंतर विशेष लेखापरीक्षकांनी तो अहवाल यवतमाळच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची परवानगी गुन्हे शाखेकडून राज्याचे अपर पोलीस महासंचालक यांच्याकडे मागण्यात आली. अपर महासंचालकांनी परवानगी दिल्यानंतर सोमवारी रात्री या प्रकरणात विशेष लेखापरीक्षक अवधूतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही ताफा आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कार्यवाही सुरू होती.