माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा व त्याचे अन्य चार साथीदार पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आज त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्या सर्वांना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शिवा हा शुभम लोणकरच्या संपका&त होता. त्यामुळे शिवाच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या शिवकुमार गौतम याचा मुंबई गुन्हे शाखा कसून शोध घेत होते. पण शिवाचा काही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर शिवा यूपीत असल्याचे कळताच तेथे गुन्हे शाखेचे पथक गेले होते. सलग 15 दिवस कसून शोधाशोध केल्यानंतर बाबा सिद्दिकी हत्याकांडातला मुख्य शूटर शिवकुमार गौतम हा पथकाच्या हाती लागला. त्याच्याबरोबर अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलंद्र अशा अन्य चौघांचाही या हत्याकांडात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनाही पकडण्यात आले होते. आज या सर्व आरोपींना मुंबईत आणून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.