माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सलमानभाई वोहरा असे त्याचे नाव आहे. आरोपींना आर्थिक मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सलमानभाईच्या अटकेने अटक आरोपींची संख्या 25 झाली आहे. तर या गुह्यात पंजाबहून अटक केलेल्या आकाशदीप गिललादेखील न्यायालयात हजर केले . त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली होती. हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिन्ही शूटरसह 23 जणांना अटक केली होती. नुकतेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंजाब येथून आकाशदीपला अटक केली होती. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आले होते. याचदरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या आणि अकोला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून सलमान भाईला अकोला येथून ताब्यात घेऊन अटक केली.
सलमान भाई हा मूळचा गुजरातचा रहिवासी आहे. सिद्दिकी याच्या हत्येसाठी आर्थिक व्यवहार झाला होता. हा व्यवहार सलमानभाईच्या बँक खात्यातून झाल्याचे तपासात समोर आले आहे. मे महिन्यात त्याच्या खात्यातून ती रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानंतर सलमान भाईने ती रक्कम नरेशकुमार सिंग, रुपेश मोहोळ आणि हरीशकुमार याना दिली होती. हत्येच्या कटाच्या अंलबजावणीसाठी त्या रकमेचा वापर झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.