बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; आरोपी म्हणतात, पोलिसांनी जबरदस्तीने जबाब घेतला

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने सत्र न्यायालयात आज घूमजाव केले. पोलिसांनी कोठडीत असताना जबरदस्तीने आपला कबुलीजबाब नोंदवून घेतला होता, असा दावा आरोपी शिवकुमार गौतम याने केला आहे. हा जबाब मागे घेण्यासाठी आरोपीने न्यायालयात अर्ज केला असून जबाब रद्द करण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे.

बाबा सिद्दिकी यांची काही महिन्यांपूर्वी वांद्रे येथे लॉरेन्स बिष्णोई टोळीने हत्या केली होती. या हत्या प्रकरणात 26 जणांना अटक करण्यात आली असून शुभम लोणकर, यासीन अख्तर आणि अनमोल बिष्णोई हे आरोपी पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत. तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने मकोका कोर्टात याप्रकरणी आरोपपत्रदेखील दाखल केले आहे. यातील काही आरोपींना आज सोमवारी विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या समोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. तेव्हा गोळय़ा घालणारा शूटर शिवकुमार गौतम याने पोलिसांनी कोठडीत असताना जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतल्याचा दावा केला. इतर आरोपींच्या वतीने अॅड. ओंकार इनामदार, अॅड. अंशुमन असरे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी हा कबुलीजबाब रद्द करण्याची मागणी न्यायालयाला केली. न्यायालयाने याची दखल घेत सुनावणी 17 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

पोलिसांची भूमिका संशयास्पद

शिवकुमार गौतमसह इतरही काही आरोपींनी पोलिसांच्या कृतीवर आक्षेप नोंदवला. पोलिसांनी जबरदस्तीने कोठडीत असताना जबाब नोंदवून घेतल्याने तो रद्द करण्याची मागणी आरोपींची बाजू मांडणारे वकील अजिंक्य मिरगळ यांनी केली तसेच या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा मिरगळ यांनी केला आहे.

z नितीन सप्रे, राम कनोजिया, गौरव अपुणे, अनुराग कश्यप, आकाश श्रीवास्तव, ग्यान त्रिपाठी, अखिलेंद्र प्रताप सिंग या आरोपींनी कबुलीजबाब रद्द करण्याची विनंती कोर्टाला केली आहे.