विधानसभा निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर आणि ईव्हीएम घोटाळ्यामुळे महायुतीला राक्षसी बहुमत मिळाले. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सरकारने योजनांचा अॅनास्थेशिया देऊन सत्तेचे ऑपरेशन पूर्ण केले. महायुतीकडून ‘सत्यमेव जयते’ नाही, तर ‘सत्तामेव जयते’ असा प्रकार सुरू आहे, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. डॉ. बाबा आढाव यांचे आंदोलन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आंदोलनामुळे आता ठिणगी पडली आहे. याचा वणवा होण्यास वेळ लागणार नाही, असा घणाघात करतानाच महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराच यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषण सोडले.
विधानसभा निवडणुकीमधील पैशाचा पाऊस आणि ‘ईव्हीएम’ घोटाळ्याविरोधात राज्यभरात आक्षेप घेतला जात आहे. जनतेच्या आवाजाला वाचा पह्डण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले वाडा येथे गुरुवारपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज डॉ. बाबा आढावा यांची भेट घेऊन आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा दिला. हे आंदोलन छोटे असल्याचे कुणी बोलत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावे की आता ठिणगी पडली आहे. वणवा पेटायला वेळ लागणार नाही, असा इशाराही सरकारला दिला. निवडणुकीत पैशाचा अमाप वापर झाला. भाजपच्या तावडेंचा व्हिडीओ सगळ्यांनीच पाहिल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. बाबा आढाव यांचे आंदोलन आपण पुढे नेऊ असे सांगतानाच आपण उपोषण सोडावे असे आवाहन त्यांनी केले. आपले आंदोलन केवळ आपले नसून हा देशाचा आत्मक्लेश आहे, असेही ते म्हणाले. याला प्रतिसाद देत बाबा आढाव यांनी तिसऱया दिवशी उपोषण मागे घेतले.
याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, काँग्रेस नेते उल्हास पवार, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. असिम सरोदे, ज्येष्ठ सामाजिक कार्येकर्ते विश्वंभर चौधरी आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती राजवट का नाही?
महायुतीला राक्षसी बहुमत मिळूनही शेतात पूजा अर्चा करायला का जावे लागते, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच विधानसभेची मुदत संपूनही राष्ट्रपती राजवट का लागली नाही, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा मात्र तातडीने राष्ट्रपती राजवट लागली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.
…शेतात पूजा-अर्चा करताहेत!
विधानसभा निवडणुकीत महायुतीला राक्षसी बहुमत मिळाले असले तरी महाराष्ट्रात आनंद व्यक्त केला जात नाहीय. कारण मिळालेल्या विजयावर त्यांचाच विश्वास नाहीय. सत्तास्थापनेसाठी राजभवनात जायची गरज असताना अमवास्येच्या दिवशी शेतात जाऊन पूजा करण्याची नामुष्की आली आहे, असा टोला त्यांनी लगावला. तर दुसरीकडे ‘ईव्हीएम’ मशीनवर प्रत्येकजण आक्षेप घेतोय. खुद्द पर्कला प्रभाकर यांनीदेखील 76 लाख मते कशी वाढली, असा सवाल निर्माण केला आहे. शेवटच्या तासात इतकी मते वाढली असतील तर या काळात मतदान केंद्रांवर रांगा का दिसल्या नाहीत असा सवालही त्यांनी केला.
फेरमोजणीची मागणी मान्य का करत नाही?
महायुतीचा विजय म्हणजे ईव्हीएमची करामत आहे. त्यामुळेच जिंकलेल्यांना जिंकल्यासारखे तर हरलेल्यांना हरल्यासारखे वाटत नाहीय. लोकशाहीत आपले मत कुठे जातेय याची माहिती मतदाराला मिळाली पाहिजे. कारण व्हीव्हीपॅट रिसिट मिळत असली तरी आतमध्ये रजिस्टर काय होते हे कळले पाहिजे. मात्र आयोग फेरमोजणीची मागणी मान्य का करीत नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेनेमुळे मुंबई अदानीच्या घशात गेली नाही – संजय राऊत
महाराष्ट्रातील उत्तम भूखंड हे अदानीला देण्याचा कायदेशीर ठराव केला जातो. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून जी मुंबई मिळाली ती मुंबई अदानीच्या घशात सहज घातली जात आहे. जर, शिवसेना नसती तर मुंबईचा सातबारा अदानीच्या नावावर झाला असता, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. आम्ही आहोत म्हणून मुंबई वाचली आहे असे ते म्हणाले.
ईव्हीएम प्रश्नाचे निराकरण झालेच पाहिजे – डॉ. बाबा आढाव
1952 पासून मी निवडणूका पाहत आलोय. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आलेला पैशांचा महापूर आणि सरकारी यंत्रणांचा झालेला वापर यापूर्वी मी कधीही पाहिला नाही. विधानसभा निवडणुकीतील निकाल पाहता ईव्हीएमबाबत अनेक जण शंका उपस्थित करत आहेत. ईव्हीएम संदर्भातील विचारल्या जाणाऱया प्रश्नांचे निराकरण झालेच पाहिजे, असे डॉ. बाबा आढाव म्हणाले.
शुरांचा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल
डॉ. बाबा आढाव यांच्यासारख्या तपस्वी माणसाने केलेले आत्मक्लेश आंदोलन आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. म्हणूनच मी त्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. बाबांसारखी तपस्वी माणसं हे सांगत असताना आता आपण पुढाकार घ्यायला हवा. राज्यभर आंदोलन उभारण्याची गरज आहे. जेव्हा हे आंदोलन होईल तेव्हा ज्यांना मतदानात गडबड झाली असे वाटेल ते सर्व सहभागी होतील. शुरांचा, समाजसुधारकांचा, क्रांतिकारकांचा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकशाही वाचवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
डॉ. बाबा आढाव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर आंदोलन मागे घेतले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शहरप्रमुख संजय मोरे, अॅड. असिम सरोदे आदी उपस्थित होते.