1952 पासून झालेल्या देशाच्या प्रत्येक निवडणुकीचा मी साक्षीदार आहे. आता निवडणुका इतक्या महाग करून ठेवल्या आहेत की सामान्य माणूस निवडणूक लढवण्याचा विचारही करू शकत नाही. लोकशाही व्यवस्थेत हे अभिप्रेत नव्हते. यावेळची निवडणूक तर पैसे वाटपाच्या सर्व मर्यादा ओलांडणारी होती, अशी टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. आढाव यांनी केली. याचा प्रतिकार करणे आवश्यक असून त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. कारण मी जीवनभर मूल्यांसाठीच लढत आलो आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराच्या संरक्षणार्थ डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले वाडा येथे आजपासून आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पाठिंबा देऊन पक्षाचे पदाधिकारी या उपोषणामध्ये सहभागी झाले होते. शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, गोरख सांगडे, संदेश भंडारे यावेळी उपस्थित होते. 30 नोव्हेंबरपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, देशात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू आहे. आता नागरिकांनी रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. हे करूनही गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह करावा लागेल. अदानींचे प्रकरण घडत असताना पंतप्रधान मोदीं यांनी परदेशातून त्यांना पाठिंबा दिला. या प्रकरणाची संसदेत वाच्यताही होत नाही. हे जे चालले आहे ते लांच्छनास्पद आहे. विधानसभा निवडणुकीत सरकारी पैशाचा खुळखुळा वाजला. जनतेने या पैशाला भुलू नये. मतदान झाल्यानंतर मतदानाच्या आकडेवारीमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे ईव्हीएमबाबत शंका घेण्यास जागा आहे आणि ती रास्त आहे. हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केले जात आहेत. मुस्कटदाबीच्या विरोधात समाजातील जागरूक वर्गाने बोलले पाहिजे. महात्मा फुले समता पुरस्कार वितरण समारंभानंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेत प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच आमदार रोहित पवार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांनी डॉ. आढाव यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार
डॉ. बाबा आढाव हे आत्मक्लेश उपोषण 30 नोव्हेंबरपर्यंत करणार आहेत. या वयात त्यांना हा त्रास झेपेल का या काळजीने कार्यकर्त्यांकडून डॉ. आढाव यांना उपोषण थांबवण्यासाठी सांगण्यात येत होते. मात्र, मला काहीही होणार नसल्याचे सांगत डॉ. आढाव यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.