
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत केरळच्या फलंदाजीपुढे गुजरातचे गोलंदाज निप्रभ ठरले. मोहम्मद अझरुद्दीनने नाबाद 149 धावांची खेळी करीत लढतीचा दुसरा दिवस गाजविला. दीडशतकाकडे कूच करणाऱ्या अझरुद्दीनने केरळला दुसऱ्या दिवसअखेर 177 षटकांत 7 बाद 418 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. आदित्य सरवटे 10 धावांवर त्याला साथ देत आहे.
केरळने पहिल्या दिवसाच्या 4 बाद 206 धावसंख्येवरून मंगळवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. कर्णधार सचिन बेबी पहिल्या दिवसाच्या 69 धावसंख्येवरच बाद झाल्यानंतर मोहम्मद अझरुद्दीनने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. त्याने सलमान निझारच्या (52) साथीत सहाव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी करीत गुजरातच्या गोलंदाजांची पिसे काढली. सलमान बाद झाल्यानंतर अझरुद्दीनने अहमद इम्रान (24) व आदित्य सरवटे यांना हाताशी धरून केरळला चारशे पार नेले.