रशियाने विमान पाडले; तांत्रिक बिघाड नव्हता, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

अझरबैजान येथून रशियाला निघालेले विमान कोसळून 39 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना चार दिवसांपुर्वी घडली होती. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागल्याचे सांगितले जात होते. परंतु, विमानात तांत्रिक बिघाड नव्हता तर रशियाने जमिनीवरून केलेल्या हल्ल्यामुळे विमान कोसळल्याचा आरोप अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी केला आहे. तसेच हे सर्व अजाणतेपणे घडलेले नसून रशियाचे हल्ला केला होता. त्यामुळे रशियाने आपली चूक मान्य कारावी असेही त्यांनी म्हटले आहे.

रशिया आपली चूक लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही अलीयेव यांनी केला आहे. रशिया विमान अपघाताची कारणे लपवण्याचा प्रयत्न करत आहे, ही अत्यंत दुःखद बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे. या अपघातात खोटी माहिती दिली गेली. जर रशियाकडून चुकून हल्ला झाल्याचे सांगितले जात असेल तर रशियाने दोस्त राष्ट्र म्हणून अझरबैजानची माफी मागायला हवी आणि आपली चूक स्वीकारायला हवी असे अलीयेव यांनी म्हटले आहे. तसेच अझरबैजानच्या जनतेला विमान नेमके कशामुळे कोसळले किंवा हा अपघात कसा घडला. याबाबत जाणून घेण्याचा अधिकार आहे. परंतु, रशिया काहीच बोलायला तयार नसल्याबद्दल अलीयेव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.