आयुष शिंदेच्या 152 चेंडूत 419 धावा, 43 चौकार आणि 24 षटकारांची आतषबाजी

चेंबूरच्या जनरल एज्युकेशन अॅकडमीच्या आयुष शिंदे आज क्रॉस मैदानावर 152 चेंडूंत 43 चौकार आणि 24 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 419 धावा फटकावत हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा आजचा दिवस गाजवला. त्याच्या घणाघाती खेळीमुळे जनरल एज्युकेशनने विलेपार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयासमोर 45 षटकांत 5 बाद 648 धावांचा एव्हरेस्ट उभा केला आणि या धावसंख्येसमोर टिळक विद्यालय 148 धावांतच कोलमडले. जनरल एज्युकेशनने शालेय क्रिकेट स्पर्धेच्या तिसर्या फेरीत 464 धावांचा प्रचंड विजय नोंदवत आपली आगेकूच कायम राखली.

मुंबई शालेय क्रिकेटमध्ये आजवर अनेक फलंदाजांनी विक्रमी धावसंख्या उभारताना त्रिशतकच नव्हे तर चारशतक, पंचशतकही ठोकलेत.  कल्याणच्या केसी गांधी हायस्कूलच्या प्रणव धनावडेने तर 2015-16 साली आर्य गुरूकुल शाळेविरुद्ध नाबाद 1009 धावा करून नवा शालेय विश्वविक्रम केला होता, जो आजही अबाधित आहे. तसेच पृथ्वी शॉनेही आपल्या शालेय जीवनात 546 धावांची झंझावाती खेळी साकारली होती. अरमान जाफरने तर रिझवी स्प्रिंगफिल्डसाठी 498 आणि 473 अशा खेळ्या ठोकल्या आहेत. शालेय क्रिकेटमध्ये चारशतकी खेळी करण्याची खूप मोठी परंपरा आहे आणि आज यात आयुषचेही नाव जोडले गेले. अवघ्या 45 षटकांच्या या सामन्यात आयुषने आर्य कारले (78) आणि इशान पाठकसह (62) पार्ले टिळकच्या गोलंदाजीच्या अक्षरशा चिंधडया उडवल्या. आयुषच्या फटक्यांचा वेग इतका भन्नाट होता की त्याने 43 चौकार आणि 24 षटकारांच्या जोरावर 316 धावा फोडून काढल्या.