
अयोध्येतील राम मंदिराला आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल मिळाल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री हा मेल पाठवण्यात आला होता. ‘मंदिराची सुरक्षा वाढवा’, असा इशारा यातून देण्यात आली होती. हे प्रकरण गांभीर्याने घेत राम मंदिर ट्रस्टने अयोध्येच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
धमकीचा मेल मिळाल्यानंतर अयोध्येतील सुरक्षा एजन्सींनी अलर्ट जारी केला. यासोबतच बाराबंकी, चंदौली सारख्या इतर जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे.
सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक तपासात हे धमकीचे मेल तामिळनाडूमधून पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. आता सायबर सेलने या मेलची चौकशी सुरू केली आहे, जेणेकरून मेल पाठवणाऱ्याची ओळख पटवता येईल. सध्या अयोध्या, बाराबंकी, चंदौली आणि इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.