![ram mandir](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/12/ram-mandir--696x447.jpg)
अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामाच्या दर्शनासाठी भाविकांना आता दर्शनासाठी जास्त वेळ मिळणार आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडून दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता भक्तांना श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अधिक जास्त मिळणार आहे. पूर्वी सकाळी 7 वाजता भाविकांना रामाचे दर्शन घेता येत असे. आता सकाळी 6 वाजेपासून भाविकांना श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे.
राम मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, भाविकांना जास्त वेळ श्रीरामाचे दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्शन घेता येईल. मंदिर ट्रस्टने वेळेत झालेल्या बदलांची माहितीही दिली.
आता मंगला आरती पहाटे 4 वाजता होईल. ती दिवसातील पहिली आरती असेल. त्यानंतर मंदिराचे दरवाजे काही काळासाठी बंद केले जातील. यानंतर सकाळी 6 वाजता शृंगार आरती होईल आणि राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल. मंदिरात दुपारी 12 वाजता रामलल्लांना नैवेद्य अर्पण केला जाईल, या काळातही भक्तांना रामलल्लांचे दर्शन घेता येईल. संध्याकाळी 7 वाजता आरती होईल, यावेळी मंदिराचे दरवाजे 15 मिनिटांसाठी बंद करण्यात येतील. मात्र, भाविकांना दर्शन घेता येणार आहे. दिवसातील शेवटची आरती रात्री 10 वाजता शयन आरती करण्यात येईल, त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातील.
या नवीन बदलामुळे भक्तांना जास्त वेग रामलल्लांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. याआधी सकाळी 7 वाजेपासून दर्शनाची वेळ सुरू होत होती. तसेच शयन आरती रात्री 9.30 वाजता करण्यात येत होती. या नवीन बदलामुळे सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 30 मिनिटे भाविकांना दर्शनासाठी जास्त वेळ मिळणार आहे.