पहिल्याच पावसात अयोध्येचा रामपथ रस्ता खचला, सहा अधिकारी निलंबित

ज्या रस्त्यावरून देशभरातून आणि जगभरातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी जातात, तो रामपथ रस्ता पहिल्याच पावसात खचला. या रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा आणि खड्डे पडले आहेत. रस्ता नीट बांधला नसल्याने देशभरात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याची गंभीर दखल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. यात तीन पीडब्ल्यूडी अधिकाऱयांचा समावेश आहे. या रस्त्याचे सिव्हर बनविणाऱया अहमदाबाद पंपनीला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर जल निगमच्या तीन अधिकाऱयांनाही निलंबित करण्यात आले आहे.

रस्त्यासाठी 844 कोटी रुपये खर्च

या रस्त्यासाठी तब्बल 844 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रस्त्याचे काम घाईघाईने केल्यामुळे खड्डे पडले की, बांधकामाचा दर्जा कमी होता, याची तपासणी करण्यात येत आहे. 12.94 किमीच्या रामपथावर अनेक खड्डे 8 फुटांपेक्षा जास्त खोल पडले. पोस्ट ऑफिस तिराहा ते रिकबगंज चौकादरम्यान रस्त्याची दुरवस्था मोठी आहे. येथील बहुतांश रस्ते खचले आहेत.