
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वात्मीक कराडने आवादा कंपनीला खंडणीसाठी सहावेळा धमकी दिल्याचे कंपनीच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे. ही माहिती उघड झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. आवादा कंपनीला मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावरूनही धमकी देण्यात आली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावरूनही आवाद कंपनीला खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांना जगमित्रच्या कार्यालयातही बोलवण्यात आले होते. तसेच खंडणीची धमकी देताना त्यांना सातपुडा बंगल्यावर बोलावण्यात आले होते. आम्ही तुला मंत्र्यांच्या बंगल्यावर बोलावत आहोत. त्यामुळे तुला खंडणी द्यावीच लागेल, असे सांगत कंपनीवर दडपण आणण्यासाठी सातपुडा बंगल्यावर त्यांना बोलवण्यात आले. यातून या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग स्पष्ट होत आहे. तसेच सहावेळा खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.