सैफ अली खानवर (Saif Ali Khan) 16 जानेवारीला मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याला एका रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्या रिक्षाचालकाला पैसे मिळाले नव्हते आणि त्यानेही माणूसकी दाखवत पैसे मागितले नव्हते. मात्र त्यानंतर तो रिक्षाचालक चर्चेत आला आणि त्याच्या अनेक मुलाखतीही प्रसिद्ध झाल्या. सैफच्या कठीण प्रसंगात माणूसकी दाखवणाऱ्या रिक्षाचालकाचे चहूबाजूने कौतुकही झाले. मात्र त्या रिक्षाचालकाच्या या चांगूलपणाचे एका संस्थेने कौतूक केले आहे. त्याच्या मदतीची दखल घेत त्याला चक्क 11 हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.
भजन सिंग राणा असे त्या रिक्षाचालकाचे नाव असून ज्या रात्री सैफवर जीवघेणा हल्ला झाला त्यावेळी त्याच्या रिक्षातून सैफला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यामुळे त्याच्यावर वेळेवर उपचार झाले. त्यानंतर भजन सिंग याच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध झाल्या तो चर्चेत आला. नुकतेच त्याने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, मला माहितही नव्हते की तो एक अभिनेता आहे. मला त्यावेळी तो फक्त रक्तबंबाळ अवस्थेत एक माणूस दिसला आणि त्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवायचे होते. त्याचा पांढरा कुर्ता संपूर्ण रक्ताने माखला होता, असा अनुभव सांगितला होता.
नुकतेच राणा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मला वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यारात्री मी पैशांचा विचार केला नाही. आतापर्यंत माझ्याशी करीना कपूर किंवा अन्य कोणीही संपर्क केलेला नाही आणि कोणाशी बोलणेही झाले नाही. आता न्यूज 24 मधील वृत्तानुसार, या रिक्षाचालकाला त्याच्या उत्कृष्ट कार्यासाठी एका संस्थेकडून 11,000 रुपयांचे बक्षीस देऊन संस्थेने रिक्षाचालकाचे गौरवण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपी आता पोलिसांनी पकडला आहे. तो बांगलादेशी असून शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर (30) असे त्याचे नाव आहे. तो बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.