मुलांनी काशी केली, वडिलांचा वृद्धाश्रमात मृत्यू; 80 कोटींची संपत्ती पोटच्या लेकरांनी बळकावली

काशीतील म्हणजेच वाराणसीमधील कोट्यधीश, साहित्यिक श्रीनाथ खंडेलवाल यांचे वृद्धाश्रमात निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. श्रीनाथ खंडेलवाल हे प्रसिद्ध साहित्यिक असून त्यांनी शेकडो पुस्तके लिहिली आहेत. ते साहित्यिक सोबतच एक आध्यात्मिक व्यक्ती होते. श्रीनाथ खंडेलवाल यांचे मोठे कुटुंब आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांचा एक मुलगा बिझनेसमन आहे, तर मुलगी सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. शिकल्या सवरलेल्या मुली-मुलांनी बापासोबत दगाफटका करत त्यांची 80 कोटींची संपत्ती हिसकावून घेतली. काही दिवसांनंतर ते आजारी पडल्यानंतर त्यांना असेच वाऱ्यावर सोडून दिले. म्हातारपणी वडिलांचा मुलांनी सांभाळ करायचा असतो, परंतु श्रीनाथ यांच्या मुलांनी सांभाळ करण्यास नकार दिल्यानंतर त्यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काशी येथील कुष्ठरोग वृद्धाश्रमात आणून सोडले. वृद्धाश्रमात ते 10 महिने राहिले. परंतु या पडत्या काळात कुटुंबातील एका व्यक्तीने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.

 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

श्रीनाथ खंडेलवाल यांना 2023 मध्ये पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्रीनाथ खंडेलवाल यांनी जवळपास 400 पुस्तके लिहिली. काही अनुवादित केली. ते 80 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक होते, परंतु त्यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतरसुद्धा त्यांची मुले अंत्यदर्शनासाठी आली नाहीत. मुलांनी अंत्यसंस्काराला येण्यास स्पष्टपणे नकार दिला. ते का नाही, आले याचे कारण मात्र सांगण्यास नकार दिला.  श्रीनाथ यांनी लिहिलेल्या 3 हजार पानांच्या मस्त्य पुराणची रचना आजही तितकीच चर्चित आहे.