
<<< श्रद्धा प्रथमेश >>>
नातं म्हणजे काय? माझ्या मते नात्याची पहिली बाजू म्हणजे प्रेम, विश्वास आणि संवाद यांची एकसंध गुंफण. मग ते नातं कोणतंही असू द्यात, पण ते गुंतागुंतीचे नसावे. नात्यातली सहजता हा नाती टिकवून ठेवण्याचा महत्त्वाचा घटक ठरतो तर नात्यातले संवाद हे तुमचं नातं अधिक दृढ व घट्ट करत असतात. त्यातूनच नात्यात विश्वास निर्माण होतो.
नात्यांची भिंत भक्कम असेल तर एकत्र कुटुंब पद्धत अनुभवायला मिळते. नाहीतर हल्ली विस्कटलेल्या नात्यांमुळे कुटुंब विभक्त होत आहेत हे दृश्य भीषण आहे. कुटुंब विभक्त होण्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत जसे की, अपुरा/अर्धवट संवाद, मी म्हणेन तेच योग्य समजणे, नीट ऐकून न घेणे, चुकीचे अर्थ लावणे, चूक न स्वीकारणे, लहान-मोठ्यांत अंतर करणे, समोरच्यावर काही गोष्टी लादणे, कमीपणा न घेणे आणि गृहीत धरणे. या सर्व गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. तर गृहीत धरणे ही फार गंभीर बाब आहे.
जेव्हा नात्यात आपण एखाद्याला गृहीत धरतो तेव्हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आपण आपली जबाबदारी झटकून कुटुंबातील इतर व्यक्ती व मुलांवर अवलंबून राहतो जे अयोग्य आहे. त्यामुळे त्याचे चुकीचे पडसाद घरात, कुटुंबात व समाजात उमटत असतात ज्याची जाणीव आपल्याला नसते. नाती निभावताना सहजता असेल तर ती नाती चिरकाल टिकतात व त्याचे समाधान वाटते. आपली हक्काची माणसं आहेत जी आपल्याला सावरून घेतात, चुकलो तर सांभाळून घेतात, न रागवता समजावून सांगतात, आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास दाखवतात ही जाणीवच आयुष्यभराचे बळ देऊन जाते. पण हल्ली असे चित्र पाहायला कमी मिळते.
आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्ती व तशी नाती आयुष्यात असणे खूप महत्त्वाचे आहे. नात्याची दुसरी बाजू म्हणजे आपसाआपसातली विचारांची देवाणघेवाण, संवादचा मेळ, एकमेकांसाठीचा वेळ, काळजी आणि आपुलकी. दोन व्यक्तींना जोडणाऱ्या नात्यात मोठेपणाचा आव, श्रीमंतीचा बडेजाव, उपकाराची भाषा, मदती वेळी पुढे केलेला हात व मायेच्या कुशीचा माज यांना थारा नसावा. कारण अशा गोष्टी जेव्हा कळत-नकळत घडतात, तेव्हा ते नातं ओझं वाटू लागतं आणि त्या ओझ्याखाली समोरची व्यक्ती दबून जाते. इथेच नात्याच्या भिंतीला पहिली भेग जाते. त्यातूनच मग पुढे गैरसमज, रागरुसवे, द्वेष, ईर्षा, तुलना निर्माण होऊन नात्यांची भिंत दुभंगली जाते.
नंतर उशिराने आपल्याला आपली चूक जरी लक्षात आली तरी वेळ निघून गेलेली असते. मग आश्वासने, माफी, वचन यांचे कितीही प्लास्टर केले तरी पूर्वीसारखी भिंत पुन्हा उभी करता येत नाही. म्हणून नात्यातला दुभंग टाळण्यासाठी कायम एकमेकांवर प्रेम करा, एकमेकासाठी जिव्हाळा जपा, अतूट विश्वास ठेवा, आपसात संवादाचा धागा भक्कम करा. नाती जपताना एक मात्र कायम लक्षात असू द्यात की, केवळ रक्ताची नाळ जोडली गेलीय म्हणून नातं जपायचं नसतं तर नात्यात मनाने मनाशी जोडलेली नाळसुद्धा तितकीच भक्कमपणे व सहजतेने जोडून जपता आली पाहिजे. कारण मनं जुळलेली नाती दीर्घायुषी असतात तर लादलेली नाती म्हणजे केवळ तडजोड असते.
एकत्र कुटुंबपद्धती मान्य असणे, नसणे हा वैयक्तिक निर्णय असला तरी ज्या कुटुंबात कोणाचा कोणाला ताळमेळ नाही, त्यांचे एकमेकांशी संवाद दृढ नाही, प्रेम असले तरी अपुरा विश्वास व वरवरची काळजी पाहायला मिळेल, लादलेलं आयुष्य जगावं लागत असेल असे कुटुंब कधीच नात्यातील मोकळीक अनुभवू शकणार नाही. नेहमी नियमांच्या किंवा अगदी भावनेच्या चौकटीत बांधली गेलेली नाती भरकटत जाऊन ती अर्थहीन होत जातील.