अभिप्राय – काव्याची प्रसववेदना

<<< शिवा इंगोले >>>

कवी अनंत धनसरे यांचा ‘एक सत्य’ हा दीर्घ कवितेचा संग्रह. त्यांचा हा दुसरा संग्रह आहे. आंबेडकरवादी कवी-लेखकांची वृत्तिगतता निश्चितपणाने ठरलेली असते तशी ती याही कवीच्या स्वभावाला परिचित आहे. प्रसववेदनेने ‘एक सत्य’ लिहिलं गेलं… त्या यातनांनी तडफडत ठेवणाऱ्या मरणकथेस अर्पण’ असं वाक्य त्यांच्या अर्पण पत्रिकेत आहे.

कवी अनंत धनसरे यांच्या या कवितेत विद्रोह, संयत मांडणी, अनुभव विश्व, धर्म आणि मानवता आणि सहेतुकता स्पष्ट दिसतात. या पाच बाबींवर या कवीचा शब्दसंसार थाटला आहे. थाटला हा शब्द वापरण्याचे कारण असे की, कवीजवळ अनुभवजन्य प्रतिपादनाचा विषय असून हा विषय त्याने पारंपरिक मराठी भाषेतून मांडलेला नाही. त्यानं स्वतःची अशी विवेचनात्मक निवेदन शैली वापरली आहे.

कवी एका ठिकाणी म्हणतो…

कुणी पोटासाठी नखाने जमीन पोखरतो
कुणी वासनेसाठी गू-मुताच्या जागेला दात लावतो
भू-सुरुंग पेरणाऱ्या कवितेचा
मी धरला आहे हात
लोकशाहीला बडवत आहे विषमतावादी व्यवस्था
मी असा आतून-बाहेरून पेटलेला माणूस…

या ओळी एकूण मानवी संवेदनांना आव्हान करणाऱ्या आहेत. ‘अलीकडे आंबेडकरवादी साहित्य… त्याच्या वाङ्मयीन शाखांपैकी केवळ कविता प्रवाहाला गति आली असं वाटायला लागतं…’ हे विधान करताना असंही वाटतं की, आपलं म्हणणं कवितेने – कथेने -स्वकथनाने- कादंबरीने – नाटकात किंवा अन्य प्रकारात मांडताना आपण एकाच टोकावर उभं राहून दुसऱ्या टोकावर शब्दास्त्रे डागीत असतो. हे डागणं परंपरेला धरून असलं तरीही तथागताने- जोतिबानं किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चिंतनाच्या पातळीवर इथपर्यंत साहित्याचा प्रवाह आणला तेथपर्यंत आपण पोहोचलो आहोत काय? याही प्रश्नाला सामोरे गेलं पाहिजे.

पुढे आणखी विचार करण्याला प्रवृत्त होण्यासाठी कवी म्हणतो :
‘द्वेषाच्या वेलीला येऊ दे, करुणेची फुलं
मानवतेने नांदू दे, निसर्गाची मुलं
आपण सर्व माणूस होऊ, अवघं विश्व कवेत घेऊ’

एवढी भरभक्कम शब्दयोजना केवळ जगाच्या मांगल्यासाठी या कवीनं केलेली दिसते. या त्याच्या आशावादात बुद्ध – फुले – शाहू – आंबेडकर – कबीर – पेरियार आणि तत्सह सहप्रवाशांचे तत्त्वज्ञानही आहे असेच म्हणावे लागते. वाचकांनी मुळातूनच ही दीर्घ कविता गांभीर्याने वाचावी.

(लेखक ज्येष्ठ समीक्षक आहेत)