<<< साबीर सोलापुरी >>>
सुरेश भट याचं गीतांशी, गझलांशी केवळ शाईचं नव्हे तर रक्ताचं नातं होतं. कारण सुरेश या नावाप्रमाणेच त्यांच्या रक्तात सूर होता. त्यांची प्रत्येक रचना सूर घेऊनच जन्माला यायची. त्यांच्या रचनांना चाल लावण्यासाठी संगीतकारांना फारसे प्रयास करावे लागत नसत. त्यांची गीते चाल देण्याच्या दृष्टीने संगीतकारास प्रेरणा देत असत. कारण त्या सूर, लय, ताल, शब्दसौंदर्याने शिगोशिग भरलेले असायचे. भटांची तालासुरावरची, शब्दांवरची हुकूमत इतकी निर्विवाद होती की कुठलाही मोठा गायक, संगीतकार त्यांच्या रचनांमध्ये तिळमात्र बदल करावयास धजावत नसे.
सुरेश भटांचा सुरेल आविष्कार म्हणजे श्रोत्यांसाठी आनंदाची आणि उत्साहवर्धक संगीताची मेजवानीच. भटांच्या गीत गझलांमुळे आपल्या सुंदर, सुखद आठवणींना उजाळा मिळतो. नकारात्मक भावना विरून जातात. हे भटांच्या रचना कौशल्याचे सामर्थ्य आहे. प्रतिभेचं अस्सल देणं लाभलेल्या सुरेश भटांची अनेक आशयसंपन्न गीतं, गझला चित्रपटांसाठी आणि चित्रपटाशिवाय ध्वनिमुद्रित झालेली आहेत. त्यांच्या गीतांना, गझलांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, अनुराधा पौडवाल, पद्मजा फेणाणी (जोगळेकर) सुरेश वाडकर, महेंद्र कपूर, सी. रामचंद्र, श्रीधर फडके, अरुण दाते, सुधाकर कदम, भीमराव पांचाळे आदी नामवंत गायक-गायिकांचा कंठ लाभला आहे. त्या बहुतेक गीतांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीताचा साज चढवलेला आहे. त्यातल्या काही ठळक बाबींचा संक्षेपाने उल्लेख करत आहे.
जेव्हा देवकीनंदन मुरलीचे सूर छेडतो. तेव्हा त्या सुरांचे वृंदावनाला अप्रूप असते. हे सूर ऐकण्यासाठी जणू वृंदावन जिवाचे कान करी. मेंदीच्या नुसत्या नावानेच तनामनात कोमल, तरल संवेदना तरळून जातात. मेंदी एक अतीव सुख स्पर्शाचं नाव आहे. मेंदी डोळ्यातील स्वप्नांना रंग देते. मेंदीच्या नावाने तनमन फुलून येतं. जाईच्या पाकळ्यांना दव सलत राहतं. भटांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही गाणी लता मंगेशकर यांनी ध्वनिमुद्रिकेसाठी अतिशय समरसतेने गाऊन ‘रंगबहार’ उडवून दिली आहे. सुरेश भट आणि पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यात गीतकार-गायिका एवढेच संबंध नव्हते. तर त्यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे, स्नेहपूर्वक संबंध होते.
‘घरकुल’ चित्रपटात सी. रामचंद्र यांनी चाल लावलेली ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे…’ या आशाताई यांच्या स्वरातली गझल प्रचंड दाद घेऊन गेली. यात तरलता, नाजुकता, उत्कटता यांचा मनोज्ञ संगम येतो. या दर्जेदार गझलांनी चित्रपटाच्या लोकप्रियतेत चार चांद लावले. त्याचप्रमाणे ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली’ (‘मोगरा फुलला’ अल्बम), ‘भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले’ (‘ऋतू हिरवा’ अल्बम), संगीत श्रीधर फडके. गायिका आशा भोसले, या रचना कोण विसरू शकेल?
ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांचे आणि गायिका सुमन कल्याणपूर यांनी (‘सुमन-गीते’ अल्बम) अतिशय तल्लीनतेने गायिलेले ‘चल ऊठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली…’ हे मन प्रसन्न करणारे भक्तिगीत श्रोत्यांना भक्तिरसात यथेच्छ भिजवणारे आहे. रवी दाते यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायक सुरेश वाडकर यांना घेऊन केलेल्या ‘अंतरंग’ या ध्वनिफितीत महत्त्वाचा सुरेल ठेवा आहे. ‘समजावुनी व्यथेला समजावता न आले, आताच अमृताची बरसून रात गेली, आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले…’ या गझला म्हणजे सुरेश भटांच्या अप्रतिम प्रतिभेची साक्ष आहेत.
कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या गौरवार्थ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सादर केलेली ‘कवी गौरव सुरेश भट’ ही ध्वनिफित गानरसिकांचे खचितच लक्ष वेधून घेणारी ठरली. यातील गीत-संगीताचा दुर्मीळ खजिना गौरवास्पद आहे. वानगीदाखल : पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी… (गायक : महेंद्र कपूर), सूर मागू तुला मी कसा… (गायक : अरुण दाते), चांदण्यात फिरताना माझा धरलास हात… (गायिका : आशा भोसले), गझल गायक भीमराव पांचाळे यांनी अकोला येथील गझलेच्या प्रथम मैफलीत सुरेश भटांची ‘जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही…’ ही गझल सादर केली होती. ती रसिकांना खूप आवडली.
आर्णीचे (यवतमाळ) गझल गायक सुधाकर कदम यांनी सुरेश भटांच्या गझला जाहीर गायनाच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रभर सर्वतोमुखी केल्या. भटांची गझल रुजविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा सुधाकर कदम हा विरळाच कलावंत. महाराष्ट्राचे आद्य मराठी गझलसम्राट सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी कदमांचा ‘गझल गंधर्व’ म्हणून यथोचित गौरव केला आहे. स्वत सुरेश भटांनी महाराष्ट्राचे ‘मराठी मेहंदी हसन’ म्हणून स्वहस्ताक्षरातील पत्र देऊन सुधाकर कदम यांना ही उपाधी प्रदान केली आहे. कोणत्याच गझल गायकाच्या वाट्याला हा सन्मान आणि उपाधी आलेली नाही. सुरेश भट यांच्या ‘एल्गार’ या गझल गायनाच्या कार्यक्रमाने तर महाराष्ट्रात गझलेच्या प्रांतात इतिहास घडविला.