<<< रविप्रकाश कुलकर्णी >>>
दिवाळी येते आणि चार दिवसांनी संपते. भले त्यावेळी कुणी म्हणो “दिवाळी रंगे फराळा संगे’’ तरी त्याचं अप्रूप फार राहिलेलं नाही कारण फराळाचे सर्व पदार्थ बारा महिने तेरा काळ सहज उपलब्ध असतात. मात्र दिवाळीच्या निमित्ताने जे दिवाळी अंक येतात, त्याची ओढ आजही वाचकांना आहे म्हणूनच मराठीत तीन-चारशे तरी दिवाळी अंक आजही प्रकाशित झालेले दिसतात. तसंच व्यक्तिगत खरेदी बरोबरच वाचनालयात ते वाचण्यासाठी रांग लागलेली दिसते. आता काही दिवस दिवाळी अंकाचे वातावरण दिसणार आहे. कुठल्या अंकात काय विषय आहे या माहितीची देवाणघेवाण असेल. त्याप्रमाणे वाचक नजर ठेवून असतात. विशेष म्हणजे या दिवाळी अंकाचे प्रकाशन समारंभ देखील उत्साहाने साजरे केलेले दिसले. याचाच अर्थ ‘अजून येतो वास फुलांना’ ही मोहिनी दिवाळीच्या अंकाची टिकून आहे. त्यातील काही गोष्टींकडे लक्ष वेधतो. उत्तम निर्मिती असलेलं “डोंबिवलीकर’’ मासिक, जे आमदार रवींद्र चव्हाण संपादित आणि प्रकाशित करत असतात. एखाद्या गावाच्या नावाने असलेले हे एकमेव मासिक असावं. पण आता पुण्याचा एक भाग असलेल्या कोथरूड येथून “कोथरूड’’ नावाचाच दिवाळी अंक यंदा प्रकाशित झालेला आहे. या अंकाच्या मागे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्राsद्योग मंत्री चंद्रकांत पाटील सर्वतोपरी उभे राहिलेले. त्याबाबत त्यांनी म्हटलं, ‘पुणे हे संस्कृतीचे माहेरघर’ आहे. परंतु पुण्याचे सांस्कृतिक माहेरघर कोथरूड असल्याचे मी जवळून पाहतो. त्यामुळेच कोथरूडचा स्वतचा दिवाळी अंक असला पाहिजे असं मला वाटलं. कुणी सांगावं, हे लोण वेगवेगळ्या उपनगरात पसरू शकतं. फक्त तेथील पुढारी वर्गात तशी इच्छाशक्ती हवी! विशेष म्हणजे त्यासाठी मेनका प्रकाशनचं विशेष सहाय्य झालेलं आहे. अर्थात मेनका, जत्रा, माहेर हे त्यांचे नेहमीचे अंक प्रकाशित झालेले आहेतच. एकेकाळी शतायुषी दिवाळी अंकाने विक्रीचे विक्रम केलेले आहेत. शतायुषीचे संपादक डॉ. संगमनेरकर गेल्यानंतर ‘शतायुषी’ बंद पडला होता. पण प्रदीर्घ काळानंतर यंदा मेनका प्रकाशनातर्फेच शतायुषीला पुनर्जीवन लाभलेलं आहे. ही दुर्मिळ घटना आहे. शतायुषीचं पुनरागमन स्वागतार्ह आहे.
आता दिवाळी अंक असलेल्या मंडपात/दुकानात रेंगाळताना जो अनुभव मिळतो त्याची तुलना बागेमधील फेरफटका मारताना जो आनंद होतो त्याच्याशीच करता येईल. तुमच्या दृष्टीला काय दिसेल त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण तो आनंद आहे नक्की. वेगवेगळ्या दिवाळी अंकाची मुखपृष्ठ पाहताना दृष्टी ठरत नाही. अशावेळी मी फक्त अंक चाळतो. कुठल्या अंकात काय आहे याची मनात नोंद ठेवतो. आता माझ्या हाताला ‘संस्कृती’ दिवाळी अंक आलेला आहे. त्यांचा मराठी भाषा विशेष अंक आहे. या विभागात मंगला गोडबोले यांचा ‘बायका बोलतात!’ हा लेख आहे. त्यामध्ये मंगलाबाईंनी बायकांच्या बोलण्याच्या तऱ्हा ढोबळपणे पण मस्त मांडल्या आहेत. त्यातल्या एका भागाकडे लक्ष वेधतो. त्या लिहितात,‘बायका चावट, अश्लील, उत्तेजक वगैरे बोलतच नाहीत असं मानण्याचं कारण नाही. सरासरी मनुष्य प्राण्याला जे आवडतं, कुतूहलाचं वाटतं, ते बायकांनाही वाटतंच की! सगळ्याच काही जन्मजात संत-महंत वृत्तीच्या नसतात. पण मग खासगी क्रियांसाठी स्त्राrत्वामधल्या नाजूक क्षणासाठी त्या त्यांचे स्वतंत्र शब्द तयार करतात. पुष्कळदा ते बायकांचे बायकांना कळतात. त्यावरून काही सूचक हास्यविनोद होतात. बायका बायकांमध्ये चुंबनाला ‘कॅडबरी’ म्हणून उल्लेखलेलं, लग्नानंतर वर्षभर गळ्यात जे उलट मंगळसूत्र लटकवण्याची प्रथा आहे तिला ‘लर्निंग लायसन्स’ म्हटलेलं मी ऐकलंय. याहूनही कल्पक किंवा सूचक शब्द त्या वापरतात.’
मात्र पुढे त्या म्हणतात ‘पण ते त्यांच्यापुरते ठेवणंच बरं!’ ‘निहार’ दिवाळी अंकात ‘सुख कशात आहे?’ या विभागात अनेकांनी लेखन केलं आहे. तर ‘शब्द गांधार’ दिवाळी अंकात खरंच आपण सुखी आहात काय?’ यामध्ये अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. तात्पर्य मंगलाबाईंनी मांडलेल्या विषयाकडे जाणत्यांनी लक्ष द्यावं. ‘पुणे पोस्ट’ दिवाळी अंकात एक वेगळा विषय आहे. ‘शेतकरी समजून घेताना’ हा विभाग आवर्जून बघायला, वाचायला हवा. तसेच दासू वैद्य यांच्या‘मायबाप’ कवितेत आक्रंदन आहे.
‘लिहिले छापावे, की फाडून टाकावे तुम्ही ठरवावे, मायबाप.’ तेव्हा दिवाळी अंक वाचा आणि इतरांना पण सांगा!!