<<< डॉ. सुनीलकुमार सरनाईक >>>
‘जीनियस जेम डॉ. जीएम’ या अनुराधा परब यांनी लिहिलेल्या पुस्तकात डॉ. जीएम तथा गंगाधर मोतीराम वारके या असामान्य कर्तृत्वाची गरुडझेप घेऊन नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तीची यशोगाथा वाचायला मिळते. एका असीम महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या एका जिद्दी व्यक्तिमत्त्वाचा हा झंझावाती जीवनपट निश्चितच वाचकांना अंतर्मुख करणारा आहे. डॉ. जीएम यांचा जन्म काही मोजक्या उंबरा असणाऱ्या पिळोदे बुद्रुक या लहानशा खेडेगावात झाला. या लहानशा खेड्यात राहणाऱ्या भक्तीमय वातावरणात आणि अध्यात्मिक वारसा असणाऱ्या ‘वारके’ कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ पुरुष लेवा पाटीदार समाजातील धर्मा पटेल, पण घरातले वातावरण सदैव अध्यात्मिक असल्याने वारकरी संप्रदायाशी निगडित म्हणून वारी करणारे ते ‘वारके’ झाले.
बालपणापासून प्रतिकूलता अनुभवत खडतर प्रवास करतच एम.एस्सी., पी.एचडी.पर्यंतचा शैक्षणिक प्रवास पूर्ण केला आणि चिकाटीने स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय उभा केला. या व्यवसायाचा प्रचंड व्याप वाढवतानाच त्यांनी कोविडच्या महासाथीत संपूर्ण देशासाठी व्हीटीएस म्हणजे चाचणी नळ्या पुरवण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले आणि नंतर मायक्रोबायोलॉजीतल्या अमूल्य कामगिरीसाठी त्यांना मिळालेले `BIRAC Innovation Award` सारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार असा अत्यंत रोमहर्षक, परंतु खडतर आयुष्याचा अद्भुतरम्य प्रवास लेखिकेने अत्यंत प्रभावी शैलीत मांडला आहे.
देशाला स्वयंसिद्ध बनवण्यासाठी असीम महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या या व्यक्तींच्या प्रचंड आत्मविश्वासाचा प्रत्यय वाचकांना या पुस्तकात पानोपानी येतो. या वाटचालीत आलेले अपयश, उभी ठाकलेली आव्हाने आणि अपमानाचे चटके यातून तावून सुलाखून निघालेल्या डॉ. जीएम यांची सकारात्मक जीवनदृष्टी, प्रचंड जिद्द, पराकोटीची चिकाटी आणि अविश्रांत परिश्रम यांचे दर्शन या पुस्तकात होते. ते एक उत्तम हुतूतूपटू असल्याने प्रसंगावधान, प्रतिकूल परिस्थितीत अनेकांशी जमवून घेणे, सांघिक शिस्त या सद्गुणांचा आविष्कार डॉ. जीएम यांच्या या यशोगाथेचे मर्म आहेत.
संयमाच्या बळावर समस्या आणि संधीचा अचूक वेध घेत प्रतिस्पर्ध्यावर मात करत मिळवलेल्या अभूतपूर्व यशातही पाय जमिनीवर ठेवण्याची त्यांची निगर्वी वृत्ती आणि यशाच्या मार्गावर चालण्यासाठी अविश्रांत घेतलेले कष्ट यांचे यथार्थ दर्शन लेखिकेने अत्यंत सुबोधपणे करून दिले आहे. आवश्यक त्या ठिकाणी संत साहित्यातील मूळ सूत्राला साजेशी वचनांमुळे या पुस्तकाला संत वाङ्मयाची उंची प्राप्त झाली आहे.
मायक्रोबायोलॉजीसारख्या क्लिष्ट विषयातील वैज्ञानिक तपशील दुर्बोध व कंटाळवाणा न होता वाचकांना रंजक व अंतर्मुख करणारा आहे. एकूणच हे पुस्तक तरुण वर्गाला दिशादर्शक असे झाले आहे.
जीनियस जेम डॉ. जीएम
प्रगतिशील उद्योगपती – शास्त्रज्ञ डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांचं कार्यचरित्र.
लेखिका : अनुराधा परब
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठे : 356
मूल्य : 425/-