यानिक सिनरने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा तीन सेटमध्ये पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. कोणताही ब्रेक पॉइंट न गमावता सिनरने दोन तास 24 मिनिटे चाललेल्या सामन्यात दुसऱ्या क्रमांकाच्या झ्वेरेव्हचा 6-3, 7-6 (4), 6-3 असा पराभव केला.
यानिक सिनर (वय 23) हा 1992 आणि 1993 मध्ये जिम कुरियरनंतर दोनदा ही ट्रॉफी जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तसेच तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा तो पहिला इटालियन खेळाडू ठरला आहे. दोन्ही खेळाडूंच्या क्रमवारीत फक्त एका स्थानाचं फरक आहे. मात्र फायनलच्या दुसऱ्या सेटशिवाय झ्वेरेव कोणत्याही सेटमध्ये सिनरला स्पर्धा देताना दिसला नाही. सामना संपल्यानंतर झ्वेरेव म्हणाला की, सध्या तू (सिनर) जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेस. मला अपेक्षा होती की, मी तुला एक कठीण स्पर्धा देईन. पण तू अप्रतिम खेळलास. सिनरचा हा सलग 21वा विजय आहे. गेल्या 5 ग्रँडस्लॅममध्ये तो तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला आहे.