एकीकडे पर्थ कसोटीसाठी हिंदुस्थानच्या अंतिम संघाची नावे निश्चित होत नाहीत. मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना हिंदुस्थानचा संयमी फलंदाज चेतेश्वर पुजारा आठवतोय. सध्या हिंदुस्थानची आघाडीची फळी कमकुवत भासत असल्यामुळे संघात चेतेश्वर पुजारा नसल्याचा सुटकेचा निःश्वास सोडलाय वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने, तर मार्नस लाबूशेनला बॉर्डर-गावसकर करंडक मालिकेत पुजारासारखा खेळपट्टीवर नांगर टाकायचाय. हिंदुस्थानी फलंदाजीला कमकुवत लेखण्यासाठी ऑस्ट्रेलियन्स फलंदाजांनी माइंड गेम केल्याचे बोलले जात आहे.
पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी मागील दोन दौऱयात हिंदुस्थानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. पुजाराने 2018-19 दरम्यान चार कसोटींत सात डावांत 1258 चेंडू खेळून तीन शतके झळकवली होती. तो हिंदुस्थानच्या विजयाचा एक शिल्पकार ठरला होता. त्याने 2020-21 च्या मालिकेत 928 चेंडू खेळले होते. मालिकेत कोणत्याही फलंदाजाने खेळलेले हे सर्वाधिक चेंडू होते. या मालिका विजयातही त्याचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे पुजारा हिंदुस्थानी संघात नाही ही आमच्यासाठी दिलासादायक बाब होय. तो असा फलंदाज आहे, ज्याची विकेट घ्यायला नेहमीच आवडते. ऑस्ट्रेलिया दौऱयात त्याने नेहमीच चांगली कामगिरी केली असल्याची आठवण हेझलवूडने काढली.
पुजारासारखा खेळपट्टीवर नांगर टाकायचाय – लाबुशेन
ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेनला हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांना थकवण्यासाठी चेतेश्वर पुजाराप्रमाणे खेळपट्टीवर नांगर टाकायचाय, म्हणजेच प्रदीर्घ खेळी साकारायचीय. पुजाराने गेल्या दोन बॉर्डर-गावसकर मालिकेत अशी खेळी केली होती. पुजाराने 2018-19 मध्ये चार कसोटींत सात डावांत 1258 चेंडू खेळून तीन शतके झळकवली होती. ही मालिका सर्वांसाठीच महत्त्वाची आहे. दीर्घकाळ टिकून खेळल्यानंतरच आम्ही आमची सर्वोत्तम खेळी साकारू शकतो, असे लाबुशेन म्हणाला. दुसऱया आणि तिसऱया स्पेलसाठी त्यांना पुन्हा गोलंदाजी करायला लावणे आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचे महत्त्व आम्हाला चांगलेच समजते. पाच सामन्यांच्या मालिकेत हे खूप गरजेचे आहे.