ग्लेन मॅक्सवेलचा झंझावात जिंकला

पावसाच्या व्यत्ययामुळे टी-20 ऐवजी सेवन-7 षटकांच्या झालेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या 19 चेंडूंतील 43 धावांचा झंझावात जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 94 या धावांचा पाठलाग करणारा पाकिस्तान केवळ 9 बाद 64 धावाच करू शकला आणि वन डे मालिका गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेत विजयी सलामी दिली.

आजच्या सामन्यावर पूर्णपणे पावसाचे सावट होते आणि पावसाने दमदार सलामीही दिली. परिणामतः टी-20चा सलामीचा सामना विलंबाने सुरू झाला. हा सामना अवघ्या 7-7 षटकांचा खेळविला जाणार असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे पहिल्या चेंडूपासूनच चौकार-षटकारांची बरसात सुरू झाली. गेल्या तिन्ही वन डेत 0, 16, 0 अशा खेळ्या करणारा मॅक्सवेल तिसऱ्या स्थानावर आला आणि त्याने नसीम शाहला चार चौकार ठोकत आपल्या टी-20 क्रिकेटमधील 10 हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने 3 षटकार आणि 5 चौकार ठोकत 43 धावा काढल्या. मग मार्कस स्टॉयनिसने 7 चेंडूंत 21 धावा काढत संघाची मजल 93 पर्यंत नेली. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या आघाडीवीरांची अक्षरशः तारांबळ उडाली. तेथेच पाकिस्तानचा पराभव निश्चित झाला.  अवघ्या 3.2 षटकांत पाकिस्तानची 6 बाद 24 अशी केविलवाणी अवस्था झाली. त्यानंतर तळाच्या हसीबुल्लाह खान (12), अब्बास आफ्रिदी (ना. 20) आणि शाहिन आफ्रिदीने (11) फटकेबाजी केली. तरीही पाक 64 धावांपर्यंत पोहोचू शकला. ऑस्ट्रेलियाने एकतर्फी केलेला सामना 29 धावांनी जिंकला.