ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, हिंदुस्थानातील 5 राज्यातील विद्यार्थ्यांवर घातली बंदी

डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नियम कडक केले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाकडे दुसरा पर्याय म्हणून पाहत आहेत. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानमधील पाच राज्यातील विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे.

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांना कठोर पाऊल उचलत पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरातसह जम्मू-कश्मीरमधील विद्यार्थ्यांच्या अर्जावर कडक निर्बंध लादले आहेत. बनावट स्टुडंट व्हिसा अर्जाद्वारे ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश मिळवून हे विद्यार्थी पूर्णवेळ काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियातील फेडरेशन युनिव्हर्सिटी, वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी, व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी आणि सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटी सारख्या नामांकित विद्यापीठांनी या पाच राज्यातील विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी थांबवली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीही या पाच राज्यांवर ऑस्ट्रेलियाने बंदी घातली होती, मात्र मध्यंतरी काही नियम शिथिल करण्यात आले होते. परंतु व्हिसाचा गैरवापर वाढल्याने पुन्हा एकदा कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या सरकारने प्रदेश आधारित बंदीला आपण मान्यता देत नाही असे म्हटले आहे. मात्र विद्यापीठांना त्यांचे स्वत:चे प्रवेश धोरण ठरवण्याची मान्यता असल्याचे म्हणत एक प्रकारे याला मान्यताच दिली आहे. दुसरीकडे असोसिएशन ऑफ ऑस्ट्रेलियन एज्युकेशन रिप्रेझेंटेटिव्ह्ज इन इंडियाने मात्र हा निर्णय भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले आहे.