सोशल मीडियामुळे मुलांवर होणारे घातक परिणाम लक्षात घेत ऑस्ट्रेलिया सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
सोशल मीडियामुळे मुलांचे नुकसान होत असून याला आळा घालण्याची वेळ आली आहे, असे अल्बानीज यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कोण-कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात येणार याबाबतही अल्बानीज यांच्या एका मंत्र्याने माहिती दिली.
सदर कायदा करण्यासाठी या वर्षी संसदेत एक अध्याय मांडण्यात येणार असून कायदा झाल्यानंतर 12 महिन्यांनंतर ही वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. तथापि, पॅरेंटल कंट्रोल देणाऱ्या व्यक्तीला कोणतीही सूट दिली जाणार नाही. हा कायदा लागून झाल्यानंतर 16 वर्षांखालील मुलं सोशल मीडियाचा वापर करणार नाही याबाबत संबंधित कंपन्यांना जबाबदारी घ्यावी लागेल.
मेटाचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक, बाइटडांस चे टीकटॉक आणि इलन मस्कच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 वर्षाखालील मुलांना बंदी घालण्यात येणार आहे. शिवाय यूट्युबवरही बंदी घालण्याची शक्यता आहे, असे ऑस्ट्रेलियाचे दळणवळण मंत्री मिशेल रोलँड यांनी सांगितले. अद्याप सोशल मीडिया कंपन्यांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.