पर्थ कसोटीत चौथ्या दिवशीच झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघ हादरलाय. त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या देहबोलीत ती दहशत स्पष्टपणे जाणवतेय. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर जोश हेझलवूडने दिलेल्या मुलाखतीनंतर ऑस्ट्रेलियन संघात फूट पडल्याचे दिसत होतेच आणि त्याचे परिणामही जाणवू लागलेत. त्यामुळे गुलाबी कसोटीआधी आणखी काही वेगळेही घडू शकते, असे संकेतही महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी दिले आहेत.
कुणी काहीही म्हणो, ऑस्ट्रेलियन संघ प्रचंड दबाव आणि दहशतीखाली असल्याचे आता जाणवू लागलेय. खुद्द गावसकरांनी आपल्या लेखात ऑस्ट्रेलियन संघाच्या भेदरलेल्या अवस्थेचे मुद्दे मांडले. जोश हेझलवूड हा पर्थ कसोटीदरम्यान अत्यंत सुस्थितीत होता; पण कसोटीतील पराभवामुळे खेळाडूंवर दबाव वाढला आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीवर सारेच आजी-माजी कसोटीपटू तुटून पडलेत. त्याचाच एक भाग हेझलवूड आहे. फिट असलेला हा गोलंदाज अचानक दुखापतीमुळे कसोटीला मुकणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलिया जाहीर करते हे एक रहस्यच आहे. हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये असे आधी नेहमीच घडायचे. ते आता चक्क ऑस्ट्रेलियातही घडू लागलेय. बरगड्यांच्या कथित दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर गेलेला हेझलवूड काही दिवसांनी पूर्ण मालिकेतूनही बाहेर फेकला जाईल, असेही गावसकर म्हणाले.
विद्युत वेगाने शिकणारा यशस्वी
हिंदुस्थानचे अब्जावधी क्रिकेटप्रेमी यशस्वी जैसवालच्या फलंदाजीच्या प्रेमात आहेत. गावसकरही आधीपासून त्याच्या प्रेमात आहेतच, पण त्यांनी पर्थ कसोटीच्या तिसऱ्या डावातील त्याच्या खेळीचे विशेष कौतुक केलेय. तो कोणतीही गोष्ट वेगात शिकतोय हे त्याने दाखवून दिलेय. दुसऱ्या डावातला त्याचा सरळ खेळ हा युवा फलंदाज पर्थवरही मोठी खेळी ठोकणार असल्याचे सांगत होता. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे झुकलेले खांदे पाहून हे साऱ्यांनाही दिसले. यशस्वीने तयार केलेल्या वातावरणात विराट कोहलीनेही आपले आणखी एक शतक नावावर लावले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे डोकेही झुकल्याचे गावसकरांनी लिहिले.
नितीश भविष्याचा खेळाडू
अष्टपैलू नितीश रेड्डीने पर्थवर आपल्या फलंदाजीचा चांगलाच प्रभाव दाखवला. पहिल्या डावात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच त्याने दुसऱ्या डावातही हिंदुस्थानची आघाडी पाचशेपलीकडे नेण्याची किमया साधली. कसोटी पदार्पण करणाऱ्या नितीशने काय करायचेय हे पहिल्याच कसोटी दाखवून दिले. त्याने चांगले फटके मारत आपली दमदार खेळी साकारली. त्याने गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणही भन्नाट केले. तो खऱ्या अर्थाने हिंदुस्थानी क्रिकेटचे भविष्य असल्याचे गावसकरांनी लिहिले.