ऑस्ट्रेलियाच्या जिवावर इंग्लंड पार, स्कॉटलंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा विजयी चौकार

ऑस्ट्रेलिया-स्कॉटलंड सामन्यापूर्वी ‘ब’ गटातून सुपर एटसाठी स्कॉटलंड फेव्हरिट होता. तसेच स्कॉटलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांचे भवितव्य ऑस्ट्रेलियाच्या हातात होते आणि त्यांनी स्कॉटलंडचा 5 विकेट आणि 2 विकेट राखून पराभव करत आपल्या विजयाचा चौकारही ठोकला आणि जगज्जेत्या इंग्लंडच्या सुपर एट प्रवेशाचा मार्गही मोकळा केला. मात्र या पराभवामुळे सहसदस्य असलेल्या स्कॉटलंडचे टी-20 वर्ल्ड कपमधील आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

पाकिस्तान, न्यूझीलंड हे दिग्गज साखळीत बाद झाल्यानंतर जगज्जेत्या इंग्लंडवरही नॉकआऊटची नामुष्की होती. त्यांनी नामिबियाचा धुव्वा उडवत आपला नेट रनरेट चांगलाच उंचावला होता. त्यामुळे स्कॉटलंडला विजय हाच एकमेव पर्याय उरला होता. त्यांनी 5 बाद 180 अशी जबरदस्त धावसंख्या उभारत या सामन्यात जान आणली होती. स्कॉटिश गोलंदाजांनी 60 धावांत ऑस्ट्रेलियाचे 3 फलंदाज बाद करत नव्या इतिहासाच्या दिशेने पावले टाकली होती, पण तेव्हाच ट्रव्हिस हेड आणि मार्कस स्टॉयनिसने चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागी रचून स्कॉटलंडच्या आशाआकांक्षावर अक्षरशा बुलडोझर चालवला.

ब्रॅण्डन मॅकमलनचा घणाघात

पहिल्या षटकांत विकेट पडण्याची परंपरा या सामन्यातही कायम राहिली. पण या धक्क्यानंतर जॉर्ज मुनसे आणि ब्रॅण्डन मॅकमलनने 89 धावांची झंझावाती भागी रचत ऑस्ट्रेलियन गोलंदाजीला हादरवले. मुनसे आणि मॅकमलनने आपल्या 8 षटकांच्या भागीत 9 षटकार आणि 4 चौकारांची आतषबाजी केली. मुनसेने 23 चेंडूंत 35 तर मॅकमलनने 34 चेंडूंत 60 धावांचा झंझावात सादर केला. मग रिची बेरिंग्टननेही 42 धावांची खेळी करत स्कॉटिश संघाला 5 बाद 180 अशी आव्हानात्मक मजल मारून दिली.

7 षटकांत 89 धावांची गरज

स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी हेड आणि स्टॉयनिसला काही षटके बांधून ठेवले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 7 षटकांत 89 धावांचे जबरदस्त आव्हान उभे ठाकले होते. स्कॉटलंड इतिहास रचणार अशी शक्यता वर्तवली जात होती. तसेच इंग्लंडला साखळीतच बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलिया स्कॉटलंडला विजय बहाल करणार, असाही संशय मनात येऊ लागला होता. पण हेडने आपली फटकेबाजी दाखवत साफयान शरीफला सलग तीन षटकार खेचत सामनाच फिरवला. पण या दणक्यानंतर हेडला बाद झाला. त्यानंतर स्टॉयनिस आणि टीम डेव्हिडनेही चौकार-षटकारांची आतषबाजी करत अनपेक्षितपण सामना स्कॉटलंडच्या हातून खेचून घेतला. ऑस्ट्रेलियाने 13 षटकांत 3 बाद 92 अशी स्थिती असताना पुढील सहा षटकांत चक्क 84 धावा पह्डून काढत आपला विजय निश्चित केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकांत केवळ 5 धावा करायच्या होत्या आणि डेव्हिडने षटकार ठोकून आपल्या नॉनस्टॉप विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर स्कॉटलंड एका पराभवाने स्पर्धेबाहेर फेकला गेला.