ध्रुव जुरेलचा एकाकी लढा अपयशी; टीम इंडियाच्या A संघाचा पराभव, ऑस्ट्रेलियाची सरशी

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया A या संघांमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये पार पडला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात उतरलेल्या टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 168 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकत मालिकाही खिशात घातली.

टीम इंडियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 229 धावा केल्या होत्या. सलामीवीर अभिमन्यू (17 धावा) आणि राहुल (10 धावा) हे स्वस्तात माघारी परतल्याने साई सुदर्शन (3 धावा) आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड (11 धावा) या अनुभवी फलंदाजांकडून संघाला चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यानंतर आलेल्या ध्रुव जुरेल याने 122 चेंडूंचा सामना करत 5 चौकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला रोचिचिओली याने बाद केले. याव्यतिरीक्त नितीश रेड्डी (38 धावा), तनुष कोटियन (44 धावा) आणि प्रसिध (29 धावा) यांनी संघाचा डाव सावरण्याची प्रयत्न केला. अखेर टीम इंडियाचा संपूर्ण संघ 229 धावांवर बाद झाला. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 168 धावांचे आव्हान चार विकेट गमावत पूर्ण केले आणि 6 विकेटने सामन्यासह मालिका सुद्धा खिशात घातली.

दरम्यान, पहिल्या डावात टीम इंडियाने सर्व गडी बाद 161 धावा केल्या होत्या. प्रत्तुत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात सर्व गडी बाद 223 धावा केल्या होत्या. परंतु दुसऱ्या डावात टीम इंडियाचे फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरल्याने टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्स्टास (128 चेंडू 73 धावा) आणि ब्यू वेबस्टर (36 चेंडू 46 धावा) नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.